येवला : येथील श्री गुरूदेव दत्त नागरी सहकारी पतसंस्थेतील अफरातफर व गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन चेअरमन सह संचालक मंडळ व कर्मचार्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकचे सहकारी संस्था विशेष लेखापरीक्षक सूर्यकांत तुकाराम गांगुर्डे यांनी या संदर्भात शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान, १९ सभासद व्यक्तींच्या नावे कर्ज रक्कमा टाकून तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळ, कर्मचार्यांनी ठेवीदारांच्या रक्कमेचा अपहार करून व कर्ज वाटपात अनियमीतता करून ठेवीदारांचा संगनमताने विश्वासघात करून फसवणूक केल्याचे सदर फिर्यादीत लेखा परीक्षक गांगुर्डे यांनी म्हटले आहे.
गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे तत्कालीन चेअरमन भारत गोविंद धुमाळ, संचालक राजेश सुधाकर बांगर, गोरखनाथ रामभाऊ सैंद्रे, प्रविण निवृत्ती धुमाळ, संजय एकनाथ धुमाळ, मनिषा काशिनाथ धुमाळ, सोपान नामदेव पवार, मेघा संजय धुमाळ, संतोष आत्माराम केंद्रे, कुणाल भरत धुमाळ ( सर्व रा. अंदरसुल ता. येवला), व्यवस्थापक सचिन पांडूरंग कुक्कर (रा. येवला), वसुली अधिकारी संदीप पोपट गायकवाड ( रा. कुसूर ता. येवला) यांचे विरूध्द ७ कोटी ६९ लाख ७० हजार ९५९ रूपयांचा अपहार, गैरव्यवहार केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम १९९९ च्या कलम ३ प्रमाणे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी हे स्वत: करत आहेत.