येवला – माती हा लोकांच्या दृष्टीने नेहमीच कायम दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. मातीचे संवर्धन जपण्यासाठी जगाचे लक्ष याकडे वेधण्यासाठी ५ डिसेंबर हा जागतिक मृदादिन साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून येवला तालुक्यातील नागडे गावात हा मृदादिन साजरा करण्यात आला. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी स्वाईल हेल्थ कार्ड योजना सुरू केली असून याचाच परिपाक म्हणून नागडे येथील शेतकरी दुर्गेश प्रभाकर शिंदे यांच्या शेतावर हा मृदादिन साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून त्यातील घटक तपासणी करून त्यातील रासायनिक मात्रा तसेच अनावश्यक घटक कोणते आहेत ह्याचे माती परीक्षण प्रयोग शाळेत परीक्षण केले जाऊन त्याची पत्रिका तयार केली जाते. असाच उपक्रम येवला कृषी विभागाच्यावतीने या जागतिक मृदा दिनानिमित्त नागडे गावात राबविण्यात आला. परिसरातील तथा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने घेऊन त्याचे परीक्षण करून त्याचे स्वाईल हेल्थ कार्ड शेतकऱ्यांना खा.डॉ.भारती पवार यांचे हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. जसे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो तशीच काळजी आपण आपल्याला अन्न देणाऱ्या शेतीचीही घेतली पाहिजे. त्यासाठी तिचे परीक्षण वेळोवेळी करणे गरजेचे असून जमिनीची सुपीकता कशी वाढवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खते वापरूनच शेती केली पाहिजे. जेणेकरून कीटकनाशके, रासायनिक खते यांचा वापर कमी होऊन आरोग्यदायी शेतीतून गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळेल आणि शेतीच्या मातीचा पोत सुधारण्यास ही मदत होईल असे प्रतिपादन खा.डॉ.भारती पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना केले.
याप्रसंगी येवला भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ.नंदकुमार शिंदे, कृषी अधिकारी कारभारी नवले साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी जे.एस. क्षीरसागर, निगळ, कृषी पर्वेक्षक एम एल वरपे , कृषी सहाय्यक आढाव, कृषी सहाय्यक सौ.पाटील, येवला शहराचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जेष्ठ नेते प्रमोद सस्कर, भाजपा शहराध्यक्ष तरंग गुजराथी, माजी भाजपा तालुकाध्यक्ष राजू परदेशी, बापू गाडेकर, नगरसेविका छाया क्षीरसागर, शामल क्षीरसागर, सरोजिनी वखारे प्रा.नितीन शिंदे, सह्याद्री बायोलॅबचे राजेंद्र हांडोरे यांचेसह येवला तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी प्रभाकर शिंदे, लहाणू शिंदे ,खंडू सातळकर, सूर्यभान साताळकर, अरुण साताळकर, भगवान काळे, हिरामण खराटे, राकेश जमदाडे, संजू शिंदे, लक्ष्मण लोणे, परशराम गायकवाड आदींसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.