येवला : शिर्डीतील एबीपी माझाचे प्रतिनिधी नितीन ओझा यांच्या विरूध्द शिर्डी संस्थानने दाखल केलेला गुन्ह्याच्या महाराष्ट्र पत्रकार संघाने निषेध केला आहे. तहसीलदार कार्यालयात भाऊसाहेब हावळे यांना सदर निवेदन देण्यात आले. ओझा यांचे विरूध्द दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे.
राज्यासह देशातही पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहेत. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखला जाणारा पत्रकारच शासन-प्रशासनाचा बळी ठरत असल्याची खंत यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन देशमुख, प्रविण पहिलवान, सय्यद कौसर यांनी व्यक्त केली. निवेदनप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र वाघ, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, प्रशांत कळंके, शकील शेख, सलीम काझी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.