पंचायत समिती सभापती गायकवाड यांची मागणी
येवला – जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी गोपनीय अहवाल व चटोपाध्याय वेतन श्रेणींसाठी ऑनलाईन प्रणाली वापरण्याची मागणी पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षणाधिकारी राजेश म्हसकर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांना सेवानिवृत्त होताना आपल्या सेवापुस्तकाबरोबर सर्व गोपनीय अहवाल जोडावे लागतात. तसेच पदोन्नतीसाठी सर्व कागदपत्रेही सादर करावी लागतात. वेगवेगळ्या तालुक्यामध्ये नोकरी केलेल्या शिक्षकांसाठी किंवा इतर जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांसाठी पदोन्नती वा सेवानिवृत्ती वेळी गोपनीय अहवालांची मोठी अडचण निर्माण होते. यासाठी सभापती गायकवाड यांनी ऑनलाइन प्रणाली राबविण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी राजेश म्हसकर यांचेकडे केली.
सभापती गायकवाड यांच्या मागणीला प्रतीसाद देत बनसोड, म्हसकर यांनी, येवला तालुक्यातील शिक्षकांसाठी हा नवीन प्रोजेक्ट हाती घ्यावा असे लेखी कळविलेे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार तालुक्यातील शिक्षकांसाठी सभापती गायकवाड यांनी सदर प्रकल्प हाती घेतला आहे. तालुक्यातील सर्व शिक्षक कर्मचार्यांचे सेवापुस्तक ऑनलाइन झाले. त्याच पद्धतीवर गोपनीय अहवाल पण ऑनलाईन करून त्याचा पासवर्ड एक जिल्हा परिषदेकडे व एक वैयक्तिक संबधित शिक्षकाकडे ठेवून ही मोहीम राबवली गेली. जिल्हाभर अशीच पद्धत राबविली जावून शक्षकांचे सर्व कागदपत्रे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये जमा असतानासुद्धा शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वर्षे पाठपुरावा करावा लागतो. वारंवार पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे चकरा माराव्या लागतात. शिक्षकांना या समस्येतून मुक्त करण्यासाठी दर बारा वर्षानंतर देण्यात येणार्या चटोपाध्याय वेतनश्रेणी संदर्भात सुद्धा ऑनलाइन पध्दती राबवली गेली पाहिजे, अशी मागणी सभापती गायकवाड यांनी सदर निवेदनात केली आहे. या प्रसंगी बाळापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अंकुश शिरसाठ उपस्थित होते.