येवला – शहरातील लक्कलकोट भागासह दाटवस्तीच्या भागात जाऊन शिक्षकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षितता व सोशल डिस्टंसिंग बाबत प्रबोधन केले. तसेच मास्क व कापडी पिशव्यांचे वाटप केल्या गेले.
दाट वस्तीच्या भागात सोशल डिस्टंसिंग पाळायला बंधने येतात. घराबाहेर निघताना आठवणीने मास्क लावले जात नाहीत. याबाबी लक्षात आणुन देत शिक्षक सहकार संघटनेचे राज्यसंघटक गजानन देवकत्ते व विलास बांगर यांनी घरगुती, टिकाऊ व सुरक्षीत मास्कचे वाटप केले. तसेच प्लास्टीकमुक्तीचा संदेश देत कापडी पिशव्यांचे यावेळी वाटप केल्या गेले. संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांचा वाढदिवस असल्याने सदर उपक्रमाला अधिक गती मिळाली. सदर उपक्रमात गजानन देवकत्ते, विलास बांगर, अविनाश जुमडे, शरद बरमे, सुनील कैरमकोंडा आदी सहभागी झाले होते.