येवला : कोरोनाच्या पाश्वभूमीवर ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्तीभूमीवरील १३ ऑक्टोबर निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र, ऑनलाईनव्दारे मुक्ती महोत्सवाचे कार्यक्रम संपन्न झाले. आज शासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत मानवंदना दिली गेली. येथे रोषणाई, सजावट करण्यात आली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तीभूमी म्हणून संबोधण्यात येते. दरवर्षी १३ ऑक्टोबर या दिवशी देशभरातून लाखो बौद्धबांधव मुक्तीभूमीवर डॉ. बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. तसेच वर्षभर हजारो पर्यटक आणि बौद्धबांधव येथे भेटी देत असतात. या स्थळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान बौध्दबांधवांसाठी अतिमहत्वाचे तीर्थस्थळ बनलेले आहे.