येवला – तालुक्यातील मुखेड येथे श्री भवानी माता मंदिरात वडिलांसह घटस्थापनेसाठी आलेल्या मुसळगावच्या पंधरावर्षीय एकुलत्या एक शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुखेड – महालखेडा रस्त्यावर श्री भवानी मातेचे मंदिर आहे. परिसरातील शेतकरी ग्रामस्थ या मंदिरात घटस्थापना करतात. गोरख पुंजाबा सोनवणे हे मुसळगाव एमआयडीसीत नोकरीत आहेत. मुखेड येथे त्यांची एक हेक्टर शेतजमीन आहे. पारंपारिक धार्मिक विधी करण्यासाठी ते व त्यांचा दहावीत शिकणारा मुलगा समाधान याचेसह येथील भवानी मंदिरात घटस्थापना करण्यासाठी आले होते. गोरख सोनवणे हे भवानीमातेच्या मंदिरात पूजेसाठी थांबले होते तर मुलगा समाधान देवीच्या पूजेसाठी पाणी आणण्यासाठी मंदिरालगत असणार्या अरुण पगार यांची शेत जमीन गट नंबर ९४० मधील शेततळ्यावर गेला होता. सुमारे अर्धा पाऊण तासाचा विलंब होऊन ही समाधान येत नसल्यामुळे गोरख सोनवणे हे तळ्यावर गेले असता तळ्याच्या काठावर समाधानचे सँडल दिसून आले. सोनवणे यांना पाणी भरून घेताना समाधान पाण्यात पडला असावा अशी शंका आली. त्यांनी माजी उपसरपंच रत्नाकर आहेर यांच्याकडे संपर्क साधून मदतीची मागणी केल्यावर त्यांच्यासह ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणार्या नवनाथ भवर या युवकास तळ्यात उतरवण्यात आल्या नंतर समाधान चे पार्थिव बाहेर काढले. दुर्दैवाची बाब म्हणजे समाधान हा गोरख सोनवणे यांचा एकुलता एक मुलगा होता.
याप्रसंगी माजी सरपंच अनंता आहेर, पोलीस पाटील सुरेश वाघ, अरुण आहेर, महेश अनर्थे, विनायक आहेर आदींसह ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभाग घेतला. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहे. दरम्यान, सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.