येवला – कोरोनाच्या काळात नागरिकांचे प्राण वाचविणे ही महत्वाची जबाबदारी असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात शासन निधी खर्च करत आहे. कोरोनाच्या काळात निधीची कमतरता निर्माण झाली असली तरी विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर,उपनगराध्यक्ष सनी पटणी, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, माजी नगराध्यक्ष निलेश पटणी, नगरसेवक प्रवीण बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, वसंत पवार,अरुण थोरात, दीपक लोणारी, शीतल शिंदे, राहुल लोणारी, सुनील शिंदे, सुनील पैठणकर, साहेबराव धनवटे,संजय पवार, प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसिलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्यासह पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आज भूमिपूजन करण्यात आलेली विकास कामे लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यात यावीत. गेल्या पंधरा वर्षात येवला मतदारसंघात विविध विकास कामे केली. लोकांची कामे करत असताना नेहमीच सर्वांचे सहकार्य लाभले आहे. गेल्या पाच वर्षात राहिलेली कामे या पाच वर्षात वेगाने करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. येवला-नाशिक रस्त्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून १७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून हा संपूर्ण रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
येवला भूमिगत गटारींसह रस्त्याची रखडलेली कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. येवला-विंचूर चौफुली येथे अनेक व्यावसायिक व्यवसाय करत होती याठिकाणी नवीन शॉपिंग सेंटरची निर्मिती करण्यात येत असून याठिकाणी १५० गाळे उपलब्ध करून देण्यात येत आहे. याठिकाणी वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्या विस्थापित व्यावसायिकांच्या व्यवसायांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे सांगत पालकमंत्री भुजबळ म्हणाले, गोर गरीब व्यवसायिकांना न्याय देण्यात येईल त्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव मांडण्यात येईल.
कोरोनाच्या काळात मास्क व डिस्टन्सच्या नियमांचे पालन नागरिकांनी करण्याची गरज आहे. ‘शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम शासनाने हाती घेतली असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपणच घ्यावी. शासनाकडून अवश्यकत ती मदत करण्यात येत आहे. तुम्ही आम्ही काळजी घेतली तरच आपण कोरोनाला दूर ठेवू यासाठी अधिक काळजी घ्यावी असे आवाहनही पालकमंत्री भुजबळ यांनी केले.
यावेळी नरेंद्र दराडे म्हणाले की, गेल्या कामात रखडलेली कामे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून करण्यात येतील. येवला शहरात तयार करण्यात आलेल गार्डन अतिशय सुंदर वास्तू तयार झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
येवला शहरात छोटी मोठी २० गार्डन तयार करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना दिली.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवले नगरपालिका सर्वे नं. ८७ मधील विकसित केलेले बगीच्याचे लोकार्पण, प्रभाक क्रमांक १ मध्ये लक्ष्मीमाता मंदिर ते ईदगाह मैदान पावेतो भुमिगत गटारीसह रस्ता कॉक्रीटींकरण, भगवती स्विटस् पासुन ते खांगटे हॉस्पीटल यांचे घरापावेतो पावेतो भुमिगत गटारीसह रस्ता कॉक्रीटींकरण,लक्ष्मी माता मंदिर ते सोमनाथ जाधव पावेतो रस्ता कॉक्रीटींकरण, नगरमनमाड हायवे नाला ते गंगादरवाजा नाका पावेतो भुमिगत गटार तसेच प्रभाग क्रमांक १२ आ ४५ मध्ये I.H.S.D.P. अंतर्गत विकसित केलेल्या वसाहतीत मुलभुत सुविधा पुरविणे, क्रं ४५ मध्ये I.H.S.D.P. अंतर्गत विकसित केलेल्या वसाहतीत मुलभुत सुविधा पुरविणे, गंगादरवाजा ते लुटे किराणा पावेतो रस्ता कॉक्रीटींग करणे व भुमीगत गटार, कृष्णा नागपुरे ते शिवगजरा किराणा ते भागवत सर पावेतो रस्ता कॉक्रीटींग करणे व भुमीगत गटार,नगर मनमाड हायवे ते रेल्वे स्टेशन पावेतो रस्ता डांबरीकरण, स.नं. 40 मधील रस्ते डांबरीकरण, वल्लभ नगर भागात कृष्णा कुमावत ते अशोक लाड व भगवान शेवळेकर ते रंगनाथ खिंडारी पावेतो रस्ता डांबरीकरण व भुमीगत गटार या विविध विकास कामाचे भुमीपूजन करण्यात आले.
शॉपिंग कॉम्प्लेक्सची पाहणी
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहरातील विंचूर चौफुली येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स ची पहाणी केली. याठिकाणी जुन्या व्यावसायिकांना गाळे प्राधान्याने उपलब्ध होतील यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव शासनास पाठवावा असे आदेश त्यांनी दिले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर, मुख्याधिकारी संगिता नांदुरकर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.