येवला : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का बसला असून अनेक ठिकाणी सत्तांतर झाले आहे.तालुक्याती ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक जाहीर झालेल्या होत्या. यापैकी ८ ग्रामपंचायतींसह १८९ जागा बिनविरोध झाल्या होत्या. ६१ ग्रामपंचायतींसाठी ८४.३४ टक्के मतदान झाले होते. ६१ ग्रामपंचायतींच्या १८५ प्रभागाच्या ४६३ जागांसाठी १००९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले होते. सोमवारी सकाळी दहा वाजता तहसिल कार्यालयात मतमोजणीस सुरूवात झाली. अर्धा तासात पहिला निकाल हाती आला. तालुक्यातील नगरसुल, पाटोदा, अंदरसुल, अंगणगाव, राजापूर, साताळी, धुळगाव, भाटगाव, ठाणगाव, देशमाने, निमगाव मढ, अंगुलगाव येथे प्रस्थापितांना धक्का बसला असून परिवर्तन घडून आले आहे.
अंगणगाव येथे राकाँ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांच्या पॅनलने ७ जागांवर निर्विवाद बहुमत मिळवून सत्ता हस्तगत केली आहे. प्रतिस्पर्धी पॅनलला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अंगुलगाव येथे पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड, बाजीराव जाधव यांचे नेतृत्वाखालील विकास पॅनललने ९ पैकी ९ जागा मिळवून सत्तांतर घडवून आणले आहे. प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला खातेही उघडता आले नाही. बोकटे येथे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, प्रताप दाभाडे यांचे नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलने ९ पैकी ८ जागा मिळवून आपली सत्ता कायम राखली आहे. प्रतिस्पर्धी पॅनलला अवघी एक जागा मिळाली. नगरसुल येथे सत्ताधारी प्रमोद पाटील, सुनील पैठणकर यांच्या महाविकास आघाडी पॅनलला अवघ्या ३ जागा मिळाल्या असून प्रतिस्पर्धी सुभाष निकम, संकेत पाटील यांच्या परिवर्तन पॅनलला १४ जागा मिळाल्या आहेत. पाटोदा येथे सत्ताधारी शिवसेना तालुका प्रमुख रतन बोरनारे, सुर्यभान नाईकवाडे यांचे नेतृत्वाखालील पॅनलला ६ जागा मिळाल्या असून प्रतिस्पर्धी साहेबराव आहेर, अशोक मेंगाणे यांचे नेतृत्वाखालील पॅनलला ११ जागा मिळाल्या आहेत. अंदरसुल येथे सत्ताधारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अॅड. सुभाष सोनवणे, मकरंद सोनवणे यांचे नेतृत्वाखालील पॅनलला ६ जागा मिळाल्या असून प्रतिस्पर्धी अॅड. बाबासाहेब देशमुख, कृउबा माजी सभापती किसनराव धनगे, गणपतराव देशमुख यांचे नेतृत्वाखालील परिवर्तन पॅननला ८ जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे अंदरसुल येथे ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.