यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते भागवतराव सोनवणे यांनी वर्तमानपत्रांची भूमिका व सहकार्य असल्याशिवाय सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिमा तयार होत नाही असे सांगून वर्तमानपत्रांचे विविध क्षेत्रातील महत्त्व त्यांनी नमूद केले. पत्रकाराला स्वतंत्र उपजीविकेचे साधन असले पाहिजे तेव्हाच पत्रकार म्हणून ते चांगली जबाबदारी पार पाडू शकतात. पत्रकारिता हे एक व्रत असल्याचेही ते म्हणाले.
पत्रकार गायकवाड यांनी महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकारितेची सुरुवात झाली असल्याचे सांगून, या क्षेत्रात करिअर करताना समाजऋण फेडण्याची संधी मिळाल्याचे ते म्हणाले. आजची वर्तमानपत्रे व माध्यमे भांडवलदारांच्या ताब्यात गेलेली आहेत तथापि आजही काही पत्रकार नैतिकतेशी तडजोड करत नाहीत. सामना चित्रपटातील दिनू रणदिवे यांचे उदाहरण देऊन एकेकाळी पत्रकार सत्ताधाऱ्यांची खुर्ची हलवू शकत होते मात्र आता तशी स्थिती राहिली नसून सत्ताधारी संपादक व उपसंपादक यांची खुर्ची काढून घेतात असे चित्र असल्याचे ते म्हणाले. ज्या बातम्या दाखवायला जायला हव्या त्या दाखवल्या जात नाहीत. आतापर्यंत सोळाशे ३२ पत्रकारांची हत्या झालेली आहे, त्यानंतर पत्रकारांना संरक्षण देणारा कायदादेखील करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. पत्रकारांचे काम वा-यासारखं असतं, चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टींना पत्रकार प्रसिद्धी देतात पण समाजहिताची भूमिका त्यामागे असते. आपण उपजीविकेसाठी नाही तर जीविका म्हणून पत्रकारिता करत असल्याचे ते म्हणाले. काही ठिकाणी विकावू पत्रकारिताही दिसते. काही ठिकाणी आमिषे दाखवली जातात तर काही वेळा धमक्याही दिल्या जातात, पण ज्यांचा कणा ताठ असतो ते पत्रकार कशालाही घाबरत नाहीत असेही त्यांनी नमूद केले. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यातून येणाऱ्या बातम्या खऱ्याच असतात असं नाही तर वेगवेगळ्या पक्षांच्या आयटी सेलद्वारे खोट्या बातम्याही पसरविल्या जातात अशा परिस्थितीत माध्यम साक्षरतेची गरज असल्याचे ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डाॅ. भाऊसाहेब गमे यांनी येवला महाविद्यालयाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी पत्रकारितेत स्वतःचे नाव निर्माण केले असल्याचे सांगून पत्रकाराची भूमिका ‘सत्याचा संग व असत्याचा पर्दाफाश’ करणारी असली पाहिजे असे ते म्हणाले. पत्रकारितेने समाजात बदल होतात, समाजमाध्यमांमधूनही क्रांती घडून येऊ शकते मात्र त्यासाठी ही समाजमाध्यमे जपून वापरली पाहिजेत असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. पत्रकारिता हे दुधारी शस्त्र आहे. येवल्याचे पत्रकार कार्यकर्त्याच्या भूमिकेत रस्त्यावर उतरतात ही बाब अभिनंदनीय असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा गायकवाड यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय प्राध्यापक के. के. बच्छाव यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार डॉ. धनराज धनगर यांनी मानले. कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोशल डिस्टंन्सिंग चे नियम पाळून सदर कार्यक्रम संपन्न झाला.