येवला : तालुक्यात महावितरणच्या पथकाने वीज चोरी शोध मोहीम राबवून सुमारे ३ लाखांची वीज चोरी उघड केली आहे. तर वीज चोरी करणार्या २८ लोकांविरूध्द कारवाई करण्यात आली आहे. उपकार्यकारी अभियंता विनायक इंगळे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता मनोज जगताप, उमेश देवरे, सुरज हुरपडे, पिकल दुसाने, अस्वले आदींच्या पथकाने तालुक्यातील भारम, कोळम, वाघाळे, सायगाव, धामणगाव, पांजरवाडी, रहाडी येथे वीज चोरी शोध मोहीम राबविली. यावेळी २८ जणांविरूध्द भारतीय वीज अधिनियम २००३ कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. यातून सुमारे ३ लाख रुपयांचे वीज बील वसुली होणार आहे. सदर मोहीमेत १७ कृषी पंपाचा अनाधिकृत वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे. दरम्यान, येवला शहरात महावितरणची २६१ लाख तर ग्रामीण मध्ये १५८ लाख अशी तालुक्यात एकूण ४२३ लाख रूपयांची वीजबील थकबाकी असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता विनायक इंगळे यांनी दिली.