– कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अटकावासाठी सामूहिक प्रयत्नातून दुपटीने क्षमता विकसित करावी
– येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा पालकमंत्री यांनी घेतला आढावा
नाशिक – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी सामुहिक प्रयत्नातून दुपटीने यंत्रणा विकसित करण्यात याव्यात, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
येवला विश्रामगृह येथे येवला तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, प्रांतअधिकारी सोपान कासार, तहसिलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे , येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णलयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरिता सर्वानी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यकतेनुसार खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. यापरिस्थितीत रुग्णांसाठी आवश्यक सुविधा तसेच बेडसची संख्या वाढविण्यात यावी. यासोबतच अधिकच्या मनुष्यबळासाठी निवृत्त झालेल्या परिचारिका, नर्स तसेच खाजगी लोकांना मानधनावर नियुक्त करण्यात यावे, असे निर्देशदेखील आरोग्ययंत्रणेला पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिले.
विलगिकरणात असलेल्या रुग्णांची नियमित तपासणी करण्यात यावी. ज्या गृहवीलगिकरणातील रुग्णांची नियमानुसार व्यवस्था होत नसेल त्या रुग्णांना कोविड केअर सेंटर्समध्ये त्वरित दाखल करण्यात यावे. रुग्णासंख्येच्या अनुषंगाने कोविड केअर सेंटर्स वाढविण्यासाठी धर्मशाळा, भक्तनिवास आणि लॉन्स अधिग्रहित करून तेथे कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यासाठी नियोजन करावे. त्याचप्रमाणे संपूर्ण तालुका व शहरातील जे खाजगी डॉक्टर्स कोरोनाबधित रुग्णांवर उपचार करत असतील आशा खाजगी डॉक्टर्सकडून देखील रुग्णांची नियमित माहिती घेण्याच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.
कोरोनाबधित रुग्ण विलगिकरणाचे नियम न पाळता फिरत असतील अशा रुग्णांवर पोलिसांच्या मदतीने नियंत्रण ठेवण्यात यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांची कडक अमंलबजावणी करण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणेने नियोजनपूर्वक जबाबदारी पार पाडावी. तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी शहरात स्वच्छतेबाबत विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिल्या आहेत.
नगरसुल ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरची पालकमंत्र्यांकडून पाहणी
येवला तालुक्यातील नगरसुल येथे रुग्णसंख्या अधिक वाढत असल्याने आज येवला दौऱ्यावर असतांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नगरसुल येथे ग्रामीण रुग्णालय व जिल्हा परिषद शाळा येथे तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन दाखल असलेल्या रुग्णांची चौकशी केली.