येवला – तालुक्यातील कोटमगाव येथील जागृत देवस्थान असणार्या श्री जगदंबा माता मंदिर येथे वैजापूर येथील जनार्दन स्वामी आश्रमाचे दत्तगीरी महाराज यांचे हस्ते घटस्थापना करण्यात आली. नवरात्र उत्सव इतिहासात प्रथमच कोरोनामुळे रद्द झाला असून येथील घटी बसण्याची परंपराही प्रथमच खंडित झाली आहे. देवीचा नऊदिवस चालणारा येथील यात्रोत्सवच रद्द झाल्याने भाविकांमध्ये नाराजी असली तरी देवस्थानने भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ९ वाजता देवीची महापूजा करून घटस्थापना दत्तगीगिरी महाराज यांचे हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त भाऊसाहेब अदमाने, रामचंद्र लहरे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे, शरद लहरे, अप्पासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. महाआरती व घटस्थापने नंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आले. नवरात्रोत्सवा निमित्ताने नित्यनेमाने सकाळी ८ व सांयकाळी ९ वाजता देवीची पूजा व आरती मंदिर पुजारी व ट्रस्ट पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
मंदिर परिसरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जमावबंदी लागू करण्यात आली असून कोटमगाव येथे शहर पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी ४ अधिकारी, ३७ कर्मचारी, १५ होमगार्ड व एक दंगा नियंत्रण पथकाचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. भाविकांनी दर्शनासाठी येवू नये, अन्यथा कारवाईला सामोर जावे लागेल असे पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.