येवला – केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर या निर्णयाविरोधात येवला तालुक्यातील एरंडगाव येथे शेतकरी व प्रहार संघटनेतर्फे गुरुवारी मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संतापही व्यक्त करण्यात आला. गेली सहा महिने लॉकडाऊन दरम्यान बाजार पेठा ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना मातीमोल दराने कांदा विकावा लागला. आधीच खराब हवामानामुळे अत्यल्प निघालेले उत्पादन,अतिवृष्टीने साठवणुकीत मोठ्या प्रमाणात खराब झालेला कांदा उकिरड्यावर फेकवा लागला. अशावेळीस निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याला भाव मिळणार नाही ही व्यथा या आंदोलनातून मांडण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचेच काम केल्याचेही आंदोलकांनी सांगितले.