येवला – आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उभारी या उपक्रमांतर्गत उदरनिर्वाह साठी माणुसकी फाउंडेशनच्या वतीने उपयुक्त साहित्याचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ व अंकाईचे माजी सरपंच बाबूशेठ कासलीवाल, माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अल्केश कासलीवाल यांच्या हस्ते येवल्यात करण्यात आले.
ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या साठी असलेल्या विविध शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी नाशिक विभागीय आयुक्तराधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेनुसार माणुसकी फाउंडेशन व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उभारी’उपक्रम राबविण्यात येत आहे. माणुसकी फाउंडेशनच्या वतीने आवश्यक साधन साहित्य या उपक्रमंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
त्यानुसार महसूल विभाग येवला यांच्या मार्फत १ जानेवारी २०१५ पासून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाना भेटी देण्यात येऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी यादी तयार करण्यात येत आहे,
येवला तालुक्यातील अशाच आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या वारसदारांना उदरनिर्वाह करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप ना भुजबळ व बाबूशेठ कासलीवाल,माणुसकी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अलकेश कासलीवाल व तहसीलदार प्रमोदजी हिले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले,तालुका पोलिस निरीक्षक अनिलजी भवारी, शहर पोलिस निरीक्षक संदीपजी कोळी ,अरूण मामा थोरात, जि प सदस्य महेंद्र काले,संजय बनकर,प स सदस्य मोहन शेलार,गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख,तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले,नायब तहसीलदार अन्नदाते,महसूल चे सर्व अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.