नाशिक – अंतिम टप्प्यात असलेल्या येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा. येत्या आठ दिवसात हे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात येईल. त्यानुसार नियोजन करून युध्दपातळीवर प्रयत्न करा. या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना कक्ष आणि सर्वसाधारण रुग्णांचा कक्ष एकमेकांपासून वेगळा कसा राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना आणि विविध विकासकामे यांच्या पार्श्वभूमीवर येवला आणि निफाड तालुक्याची आढावा बैठक लासलगाव येथील शिवकमल मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारे प्रयत्न होत आहे. या आपत्तीला इष्टापत्ती समजून शासनाकडून मिळत असलेल्या निधीतून कोरोनाचे रुग्ण बरे करण्यासोबतच रुग्णालयाचे सशक्तीकरण करा; सर्व शासकीय रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश भुजबळ यांनी दिले आहेत.
नियमित चौकशी करा
राज्य शासनाने सुरू केलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतून जो पर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत नागरिकांचे सर्व्हेक्षण करत रहा. त्यातून आढळलेले संशयितांचे तत्काळ विलगीकरण करून त्यांवर उपचारपद्धती सुरू करा. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबधितांची वैद्यकीय अधिकारी यांनी नियमित चौकशी करून माहिती घ्यावी. त्यांच्या उपचारपद्धतीमध्ये त्यांना कोणत्याही टप्प्यावर मदत पाहिजे असल्यास उपलब्ध करून द्यावी, असे भुजबळ यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मदत
येवला व निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनास सादर करण्यात यावा. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहिर केली आहे; ती मदत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळवून द्यावी. पंचनाम्याअभावी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना जर मदत मिळाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी दिला आहे.
रस्त्यांचे प्रश्न सोडवा
सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील जे रस्ते जास्त खराब झाले त्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून रस्त्यांचे प्रश्न सोडवावे. विद्युत विभागाने देखील प्राधान्याने शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे. सोळा गाव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्रालयीन स्तरावर झालेल्या बैठकीतील मुद्द्यांची माहिती यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी उपस्थितांना दिली आहे.
यावेळी येवला व निफाड तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेत अधिकाऱ्यांना सर्व प्रश्नाचे निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीस आमदार दिलीप बनकर, आ.किशोर दराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनंत पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, येवला प्रांत अधिकारी सोपान कासार, निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे,मनमाड पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे,येवला तहसिलदार प्रमोद हिले,निफाड तहसिलदार शरद घोरपडे,गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख, डॉ.संदीप कराड, मजीप्र कार्यकारी अभियंता सुजित मोरे, स्थानिक स्तर कार्यकारी अभियंता प्रवीण खेडकर, खैरनार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाग्रा, सहायक अभियंता महेश पाटील, उपअभियंता देवरे, उन्मेष पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता आव्हाड, उपअभियंता सोनवणे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी,, येवला तालुका आरोग्य अधिकारी हितेंद्र गायकवाड, निफाड तालुका आरोग्य अधिकारी चेतन काळे, सहायक निबंधक अभिजित देशपांडे,एकनाथ पाटील, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले,पोलीस निरीक्षक संदीप कोळी,खंडेराव रंजवे उपस्थित होते.
यावेळी