मुंबई – सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. रणबीर, नीतू सिंह आणि आलिया तिघेही रणथंभोरला रवाना झाल्यामुळे नव्या वर्षात किमान साक्षगंध (साखरपुडा) करून तरी परतणार, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.
मात्र, ही बातमी व्हायरल होण्यापूर्वीच रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी त्यावर पूर्णविराम लावला. त्यांनी सांगितले की रणबीर आणि आलिया केवळ नव्या वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी गेले आहेत. दोघांच्याही साक्षगंधाच्या बातमीत मुळीच तथ्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी रणबीर, आलिया आणि नीतू सिंह एकत्र मुंबई एअरपोर्टवर दिसले. त्यानंतर ते राजस्थानच्या जयपूर एअरपोर्टवरही दिसले. सध्या तिघेही रणथंबोरच्या हॉटेलप अमनमध्ये थांबलेले आहेत. नव्या वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी लोक सहसा गोवा किंवा मालदीवला जातात, मात्र रणबीरने राजस्थानचा पर्याय का निवडला असावा, याची चर्चा जास्त होत आहे. चित्रपट सृष्टीलाही हा प्रश्न पडला आहे. त्यातच काहींनी दोघांच्या साक्षगंधाची बातमी व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, रणबीरने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की कोरोनाचे संक्रमण आले नसते तर लग्न आधीच उरकून घेतले असते.
आता रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी या सर्व चर्चांना तथ्यहीन ठरविले आहे. रणबीरचे वडील स्व. ऋषी कपूर यांनीदेखील आजपर्यंत आपल्या मोठ्या भावाच्या कुठल्याही गोष्टीला चुकीचे ठरविले नाही. एवढेच कशाला तर करियरचे सर्व मोठे निर्णय देखील ऋषी कपूर यांनी भावालाच विचारून घेतले. त्यामुळे रणबीरचे लग्नही रणधीर कपूरच्याच आशिर्वादाने होणार आहे, यात काही वाद नाही. रणबीरने बुधवारी स्पष्ट केले आहे की सगळे जण काही दिवस सुट्या घालविण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी राजस्थानमध्ये आले आहेत. याशिवाय रणवीर आणि दीपिकाही त्याच हॉटेलमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दाखल झाले आहेत.