मुंबई – पेट्रोल हा आपल्या देशातील सर्वांत ज्वलंत विषय आहे आणि तो वर्षभर चर्चेत असतो. पेट्रोल आणि डिझेल कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. याचे भाव घटणे किंवा वाढणे याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असते. हल्ली तर दोन्हींचे भाव चांगलेच वाढलेले आहेत. देशात सध्या पेट्रोल ९० रुपये लीटर आणि डिझल ८१ रुपये लीटर आहे. त्यामुळे महागाईदेखील वाढलेली आहे. अशात इतर देशांमध्ये पेट्रोलचे भाव काय आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील लोकांना असते.
देशात मालवाहतुकीसाठी सर्वधासारणपणे ट्रकचाच वापर होत असतो. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी असल्या तरीही वाहतुकीचा खर्च खूप जास्त असतो. त्यामुळे वस्तूंच्या किंमतीही वाढविल्या जातात. मात्र जगात असेही काही देश आहेत, जिथे पेट्रोल हे पाण्यापेक्षाही स्वस्त आहे. व्हेनेझुएला या देशात पेट्रोल सर्वाधिक स्वस्त आहे. याठिकाणी पेट्रोलची किंमत १.४६ रुपये प्रती लिटर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इराण आहे. इराणमध्ये पेट्रोल ४.२४ रुपये प्रती लिटर व अंगोलामध्ये १७.८८ रुपये प्रती लिटर आहे. हे तीन देश असे आहेत जिथे पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त आहे. कारण पाण्याची किंमत २० रुपये प्रती लिटर आहे.
सर्वांत महाग कुठे?
जगात पेट्रोलचे दर हॉंगकॉंगमध्ये सर्वांत जास्त आहेत. याठिकाणी १६९.२१ रुपये प्रती लिटर पेट्रोल विकले जाते. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये १५०.२९ रुपये, सीरियामध्ये १४९.०८ रुपये, नेदरलँडमध्ये १४०.९० रुपये, नॉर्वेमध्ये १३५.३८ रुपये आणि फिनलँडमध्ये १३३.९० रुपये प्रती लिटर पेट्रोलचे दर आहेत. इंग्लंडमध्ये ११६ रुपये, स्वित्झर्लंडमध्ये ११५ रुपये, जर्मनीमध्ये ११६ रुपये, जपानमध्ये ९३.६२ रुपये, आस्ट्रेलियात ६८.९१, अमेरिकेत ५०.११३ आणि रुसमध्ये ४२.६९ रुपये दर आहेत. त्यामुळे जपाननंतर भारताचाच नंबर लागतो असे समजायला हरकत नाही. दुसरीकडे भारताच्या शेजारी असलेल्या चीनमध्ये ७२.६२, नेपाळमध्ये ६७.४१, अफगाणिस्तानमध्ये ३६.३४, बर्मामध्ये ४३.५३, पाकिस्तानमध्ये ४८.१९, भुतानमध्ये ४९.५६ आणि श्रीलंकेत ६२.७९ रुपये पेट्रोलचे दर आहेत.