नवी दिल्ली – कोरोनामुळे कधी नव्हे ती मुंबईची लाईफलाइन आणि देशभरातील रेल्वे सेवा ठप्प झाली. आता कुठे ती हळूहळू रुळावर येते आहे. प्रवाशांचा विचार करून रेल्वे प्रशासन आणखी काही गाड्या सुरू करणार आहे. अशातच १ फेब्रुवारीपासून सर्व पॅसेंजर गाड्या, लोकल सुरू होणार असल्याची बातमी सोशल मीडियावरून फिरायला लागली, आणि सर्वांनाच हायसं वाटलं. तर काही जण चिंतीतही झाले. पण, सगळी शहानिशा केल्यावर ही बातमी खोटी असल्याचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) सिद्ध केले. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने याबाबत ट्विट केले आहे. एका खोट्या फोटोच्या आधारे गाड्या सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे, सोशल मीडियावरही हे वृत्त वेगाने पसरते आहे. पण, ही बातमी खोटी आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे म्हटले आहे.