मुंबई – येत्या आठवड्यात महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरुपात ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस होणार तसेच, राज्यात विखुरलेल्या स्वरुपात काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते, असा दावा हवामान अभ्यासक प्रा किरणकुमार जोहरे यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी आपले अन्नधान्य उघड्यावर न ठेवता त्यांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, ताडपत्री सारख्या आच्छादनाने झाकून ठेवावे. पावसानंतर पुन्हा वेगाने पारा घसरून हुडहुडी भरेल, असेही प्रा जोहरे यांनी सांगितले आहे.
प्रा. जोहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सध्या सुरू असलेल्या पावसामुळे लवकरच पुन्हा उत्तरे कडून थंड वारे वाहू लागतील परीणामी परत महाराष्ट्रात थंडीच लाट येईल व तापमानात वेगाने व कमी वेळात घसरण होईल. यंदा मराठवाडा रेकॉर्ड ब्रेक थंडी अनुभवणार असुन औरंगाबाद 5 अंशाखाली, मुंबईत डिसेंबर पर्यंत 15 अंशाच्या खाली तर पुण्याचा 7 अंशाखाली नाशिक पुन्हा 4 अंशाखाली तर नागपूर 5 अंशाखाली असा पारा घसरणार आहे. त्यामुळे यंदा केवळ मुंबईकरांना नाही तर औरंगाबादकर आणि मराठवाड्यात देखील नागरीकांना घरबसल्या माथेरान आणि महाबळेश्वरचा फिल अनुभवत हुडहुडी भरेल. औरंगाबादकर व नागपूरकर तसेच पुणेकर व नागपूरकर गारठतील. यंदा मराठवाडा हा ढगफुटींचा प्रदेश बनला. आणि अभूतपूर्व पाऊस मराठवाड्यात झाला. 15 डिसेंबरला मान्सून संपणे अपेक्षित असल्याने हिवाळा आणि पावसाळा असे दोन ऋतूंची सरमिसळ पहायला मिळू शकेल. 20 डिसेंबर पासून रॅपिड थंडी वाढणार असून त्यावेळी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरलेले दिसून येईल, असे जोहरे यांनी सांगितले आहे.