बंगळुरू – कर्नाटकातील भाजपमध्ये सध्या असलेल्या असंतोषाने तीव्र रूप धारण केले आहे. राज्यात सध्या विधानसभेचे सात दिवसांचे अधिवेशन सुरू असून यावेळी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी दिलेल्या मेजवानीत पक्षाचे सुमारे २५ हून अधिक आमदार पोहोचले नाहीत. भाजपच्या ११८ आमदारांपैकी केवळ ८०च जण डिनरसाठी पोहोचले होते.
येडियुरप्पा यांच्यावर पक्षातील विविध नेत्याकडून प्रचंड दबाव येत होता. त्यात विरोधी पक्षातील १७ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपमध्ये सामील झालेल्या या नवीन आमदारांनी सत्तेत वाटा मिळविण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे पक्षातील मुळ आमदारांवर असमाधानी राहण्याची वेळ येऊ शकते. कारण भाजपामध्ये सामील झालेले आमदार हे आपल्याला मंत्रिपद मिळावे, अशी मागणी वारंवार करीत आहेत. १ महिन्यांच्या कालावधीत येडियुरप्पा सरकारने तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात फेरबदल केले असूनही येडीयुरप्पा यांच्या डिनरकडे २५ आमदारांनी पाठ फिरवली असून भाजपात पुन्हा असंतोष वाढला आहे.