नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात ‘यूपीएससी’ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नाशिक जिल्ह्यातील परीक्षार्थींचा नाशिक जिल्हा परिषदेतर्फे सह्रद्य सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकार्यांच्या हस्ते यशवंत परीक्षार्थींना शाल, पुष्पगुच्छ देवून सन्माणित केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या कार्यालयात मंगळवारी हा सोहळा पार पडला. यावेळी नाशिकचे स्वप्निल पवार, अंकिता वाकेकर, निफाड तालुक्यातील वावी येथील सुमित जगताप आणि सिन्नरचा नकुल देशमुख यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी) आनंद पिंगळे, ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकरी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, निवृत्ती (गोरख) बोडके आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाच युवकांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये यश मिळवले ही खरच खूप अभिमानास्पद बाब आहे. यातही अंकिता वाकेकर व सुमित जगताप यांचे आई किंवा वडील हे प्रशासकीय सेवेत आहेत. याचा त्यांना निश्चितपणे भविष्यात फायदा होईल. परंतु, स्वप्निल पवार याचे वडील रिक्षाचालक आहेत. त्यामुळे स्वप्निलचे यश हे इतर परीक्षार्थींना प्रेरणादायी ठरणारे असेच आहे. तसेच सिन्नर येथील नकुल देशमुख यांनेही अत्यंत खडतर परिस्थितीतून यश मिळवले. या सर्वांचे यश हे नाशिकच्या परीक्षार्थींना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रशासकीय सेवेत येताना आपण खूपच वेगळे आणि हुशार आहोत, अशा अर्विभावात न वागता, पाय जमिनीवर ठेवूनच राहिले पाहिजे. लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा योग्य समन्वय साधून सर्वसामान्य नागरीकांसाठी आपण अविरतपणे काम केले तर या सेवेचा हेतू साध्य होतो, असा सल्ला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी यांनीही या परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या. यावेळी यशवंत परीक्षार्थींसोबत त्यांचे आई-वडील, नातेवाईक व मित्र उपस्थित होते.