देवळाली कॅम्प – आदर्श सैनिक फाउंडेशनचे शहिदांच्या स्मृती जोपासण्याबरोबर युवा पिढीमध्ये असलेली देशसेवेची भावना वाढवण्याचे कार्य करावे जेणेकरून मायभूमीची सेवा करण्याची संधी त्यांनाही मिळाली पाहिजे असे प्रतिपादन परमवीरचक्र प्राप्त शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे वडील गिरधारीलाल बत्रा यांनी केले. लामरोडवरील नक्षत्र सोसायटी येथे माजी सैनिक व कुटुंबाच्या आधारासाठी स्थापन करण्यात आलेल्या आदर्श सैनिक फाऊंडेशनच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित २१ परमवीर चक्र प्राप्त परिवार व वीर मातापिता- वीरनारी सन्मान सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गिरधारीलाल बत्रा, कमलाकांता बत्रा, सुप्रसिद्ध लेखिका व वीरमाता अनुराधा गोरे, विजया मानेकर,पंडित अभिषेक गौतम ज्योती राणे ,कन्हैयालाल सयाग आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांसह वीरनारी राजवंती गुर्जर यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण व भारत मातेसह नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नायक दीपचंद यांनी प्रास्ताविकातून शहीद लष्करी जवान यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी या सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे सांगतांना त्यांना जाणवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आदर्श सैनिक फाऊंडेशन प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात स्व.मेजर कौस्तुभ रहाणे, कॅप्टन चंद्र चौधरी, कॅप्टन विनायक गोरे, महेंद्रसिंग गुर्जर, हेतराम गोदारा, राकेश अणेराव, श्रीकांत बोडके, अर्जुन ठाकरे,ब्रिजेशकुमार मिश्रा, नितीन अहिरे, हवालदार मधुसूदन सुर्वे, हवालदार संजीव कुमार, एकनाथ खैरनार, सुनील मोरे, कोंडाजी दराडे, यशवंत ढाकणे, शशिकांत मिश्रा, बाजीराव रौंदळ, दीपक चौधरी, केशव गोसावी,पोपट निकम, वसंत लहाने, शरद पगार, सुरेश सोनवणे, अब्दुल हमीद आदी शहीद परिवारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहिद परिवाराच्या वतीने मनोगत व्यक्त करतांना शहिदांच्या स्मृती जागविण्यात आल्या यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. सूत्रसंचालन रोहित पगारे तर आभार कॅप्टन आसाराम राठोड यांनी मानले. यानंतर २१ परमवीर चक्रप्राप्त शहिदांच्या प्रतिमा असलेल्या ( पीव्हीसी वॉल) भिंतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कोविड बाबतचे सर्व नियमांचे पालन करीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वीतेसाठी कुंदन पारीख, कर्नल वाय.व्ही.सुरी, कर्नल अशोक शिरगावकर, हवालदार सूर्यकांत गठडी आदींसह परिसरातील माजी सैनिक प्रयत्नशील होते.