नवभारतातील युवकांचे प्रेरणास्थान असलेले लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा आज दि. ८ ऑक्टोबर रोजी स्मृतीदिन, त्यानिमित्त विशेष लेख…
तो स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळ होता,इ. स. १९४२ मध्ये चलेजाव चळवळ जोशात असताना महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आदीसह अनेक नेत्यांना इंग्रज सरकारने कारागृहात टाकले होते. यात अनेक तरुण नेत्यांचाही समावेश होता. ऐन दिवाळी सणात देशावर दुःखाचे सावट होते, सर्वसामान्य जनतेला धीर देण्याची गरज होती, अशा वेळी रात्रीच्या अंधारात एका युवकाने मोठे धाडस केले. अंथरूण-पांघरूण आणि धोतराचे दोर करून त्याने कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारली, त्याच्या समवेत सहा साथीदार होते. वाट फुटेल तिकडे हे सात युवक रात्रीच्या गर्द अंधारात धावत सुटले होते, केवळ स्वातंत्र्याच्या धेय्याने आणि स्वराज्य प्रकाशाच्या प्रेरणेने हे सात वीर वेगाने निघाले होते. राष्ट्रीय नेत्यांच्या अटकेने सैरभैर झालेल्या जनतेला धीर देण्यासाठी आणि इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून ते सात वीर पुढे वेगवेगळ्या मार्गाने चालले होते. त्यातील या एका युवकाने थेट नेपाळ गाठले. लपत-छपत तहानभूक विसरून दऱ्याखोऱ्यातून काट्याकुट्यातून वाट काढत हा युवक रक्तबंबाळ होत नेपाळच्या सिमेवर गेला, तेथे त्याने युवकांना स्वतंत्र आंदोलनाची प्रेरणा देण्यासाठी कार्यालय उघडले. कोण होता तो युवक ? ते होते, नवयुवकांचे प्रेरणास्थान लोकनायक जयप्रकाश नारायण.
जयप्रकाश नारायण यांचा जन्म उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांच्या सिमेवर असणाऱ्या शरयू आणि गंगा या नद्याच्या संगमावर वसलेल्या सिताबदीयारा या गावी दि. ११ ऑक्टोबर १९०२ रोजी झाला. त्यांचे वडील हषुदयाल पाटबंधारे खात्यातील अधिकारी होते. त्यांच्या आईचे नाव फुलराणीदेवी होते. त्यांच्या वडीलांच्या अनेक ठिकाणी बदल्या होत असत. त्यामुळे जयप्रकाश यांचे बालपण अनेक गांवामध्ये गेले, त्यांचे घरातील नाव बऊल असे होते. त्यांना पाळीव प्राण्यांच्या संगतीत राहण्याची खूप आवड होती. त्यांच्या घरी अनेक माणसांबरोबरच गाई, बदक, हरिण, ससे, कुत्रे असे खूप चतुर प्राणी होते. वयाच्या नवव्या वर्षी जयप्रकाश यांना पाटणा येथे शिकण्यासाठी जावे लागले.
सरस्वती भवन वस्तीगृहात त्यांची राहण्याची सोय झाली होती. याच काळात त्यांनी लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले आदी महापुरुषांचे चरित्र वाचले. तसेच मैथिली शरण गुप्ता, भारतेंद्र हरिश्चंद्र यांच्या स्फूर्तीदायी कविता त्यांनी पाठ केल्या. आवडत्या राजपूत वीरांच्या कथा जयप्रकाश आवडीने वाचत असत. पुढे बंगाली क्रांतीकारांच्या विचारांनी त्यांचे जीवन भारावले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगेच्या किनाऱ्यावर एका गुप्त बैठकीसाठी ते गेले होते. त्यानंतर दहावी परीक्षा झाल्यावर पाटणा येथील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला, त्या ठिकाणी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.
शिक्षण घेत असताना वयाच्या अठराव्या वर्षी यांचे प्रभावतीदेवी यांच्याशी लग्न झाले, यांचे सासरे बाबू ब्रिज किशोर एक देशभक्त आणि कायदेपंडित होते, तसेच महात्मा गांधींचे अनुयायी देखील होते. कालांतराने जयप्रकाश नारायण यांनी बिहार विद्यापीठात प्रवेश घेतला, तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत जाण्यासाठी बोटीने प्रवास करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. तेथे पोचल्यावर त्यांच्या जवळील सर्व पैसे संपले होते, तसेच उच्च शिक्षणासाठीची प्रवेशाची मुदत संपली होती. त्यामुळे त्यांनी द्राक्ष बागा, मोटार गॅरेज, हॉटेल, मार्केट, आदी ठिकाणी काम केले. हा भारतीय युवक महात्मा गांधी यांचा अनुयायी असल्याने त्याला परदेशात शिक्षण घेताना कोणत्याही स्वच्छता कामाची लाज वाटली नाही.
विद्यापीठ शिक्षणाऐवजी त्यांना बाह्य जगाचे शिक्षण मिळाले. अनेक प्रांतातील शेतकरी, मजूर, कामगार आदी बरोबर त्यांचा संबंध आला. फी भरण्यासाठी पैसे जमा झाल्यावर त्यांनी सॅनफ्रान्सिस्को येथील विद्यापीठात प्रवेश घेतला. परंतु फी जास्त असल्याने त्यांनी पुढे शिकागो आणि विस्कॉन्सिन या दोन विद्यापीठात अभ्यासक्रम पूर्ण केला. या ठिकाणी समाजशास्त्र विषयाचे अभ्यास करत असताना त्यांनी थोर भारतीय विचारवंत यांचे ग्रंथ वाचले. याच काळात त्यांनी मार्क्सच्या दास कॅपिटल या ग्रंथांची पारायणे केली.
दरम्यान, त्यांनी लेनिन आणि एम. एन. रॉय यांच्या विचाराने प्रेरित होऊन रशिया येथे जाण्याचा विचार केला. मात्र डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी पत्र पाठवून त्यांना मायदेशी बोलावून घेतले. त्यानंतर भारतात आले असता त्यांनी वकील, प्राध्यापक, शिक्षक असे होण्याऐवजी समाजसेवेचा निर्धार केला. १९२९ मध्ये ते काँग्रेस पक्षाच्या कामगार विभागाचे प्रमुख होते. इ. स. १९३० मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीने जोर धरला होता. याच काळात जयप्रकाश नारायण यांना अटक होऊन त्यांची रवानगी नाशिक येथील कारागृहात करण्यात आली. या ठिकाणी त्यांना अशोक मेहता, राम मनोहर लोहिया, मिनू मसानी, अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे आदी धडाडीचे कार्यकर्ते भेटले. कारागृहात सर्वांचे वाचन,मनन, चिंतन, विचारमंथन,वाद-प्रतिवाद, चर्चा होत असत. कारागृहातून सुटल्यावर जयप्रकाश हे जेपी नावाने परिचित झाले.
जेपी, आचार्य नरेंद्र देव अच्युतराव पटवर्धन आदिं समविचारी सहकाऱ्यांनी इ. स. १९३४ मध्ये काँग्रेस समाजवादी पार्टीची स्थापना केली. १९३६ मध्ये त्यांनी समाजवादाची गरज हा ग्रंथ लिहला. त्यांनी समाजवादी आणि साम्यवादी यांना एकत्र घेत काम करण्यास सुरुवात केली. त्यात अनेक अडचणी आल्या तरीही त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने कार्य सुरु ठेवले. जेपी यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला.
दि. १५ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या केंद्रीय मंत्रीमंडळात पंतप्रधान पंडित नेहरू यांनी जेपी यांना स्थान देऊ केले. परंतु वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी त्याला नकार दिला. तसेच ते समाजवादी पक्षाबरोबर कायम राहिले. १९५४ ते १९७२ या काळात जयप्रकाश नारायण हे विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात सहभागी झाले होते.
पुढे इंदिरा गांधी यांच्याबरोबर त्यांचे तीव्र वैचारिक मतभेद झाले. त्यानंतर १९७३ मध्ये त्यांनी शिक्षण आणि निवडणुका या संदर्भात अपक्षीय शांततापूर्वक असा सुधारणात्मक कार्यक्रम लोकांसमोर ठेवला. बिहार प्रमाणेच गुजरात आंदोलनाच्या युवक चळवळीचे ते नेते झाले. १९७७ च्या आणीबाणीच्या काळात युवकांना तसेच लोकनेत्यांनी आणि राष्ट्राला त्यांनी एक प्रकारे दिपस्तंभा सारखे मार्गदर्शन केले.
युथ फॉर डेमॉक्रसी या संकल्पनेचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. १९६५ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय रमण मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनेक सामाजिक, राजकीय आघात झेलत , सर्वांगीण स्वातंत्र्य आणि समता यांच्या पुरस्कार करणारा जयप्रकाश नावाचा देशातील युवकांचा तेजस्वी प्रेरणादायी सूर्य दि. ८ ऑक्टोबर १९७९ या दिवशी अस्ताला गेला.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail. com)