मुंबई – राज्यात युरिया खताला असलेली मागणी पाहता केंद्र शासनाकडे पाच लाख मेट्रिक टन अतिरिक्त युरिया साठा देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना युरिया कमी पडणार नाही, असा दिलासा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
भुसे यांनी सांगितले की, राज्यात पेरणी वेळेवर पूर्ण झाली आहे. पावसामुळे पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाली झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे एकाचवेळी खतांची मागणी वाढली. त्याचबरोबर यावर्षी द्रवरुप खतांचा वापरही कमी होत आहे परिणामी युरियाचा वापर वाढला आहे. राज्यातील खतांची परिस्थिती पाहून नुकतेच केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून राज्यासाठी अतिरिक्त पाच लाख मेट्रिक टन युरिया देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे भुसे यांनी सांगितले. राज्य शासनाने केंद्र शासनाकडे १७ लाख मेट्रिक युरियाची मागणी केली होती मात्र त्यात २ लाख मेट्रिक टन कपात करून राज्याला १५ लाख मेट्रिक टन युरिया पुरवठा झाला आहे. मात्र हा कपात केलेला २ लाख मेट्रिक टन युरियादेखील उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात गेल्या १५ दिवसांपासून विक्री केलेल्या युरियाचे ट्रॅकींग केले जात असून एखाद्या शेतकऱ्याला ज्याप्रमाणात युरिया विक्री झाली त्याचे तेवढे क्षेत्र आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे, असे भुसे म्हणाले. ज्या दुकानांचे साठेबाजी मुळे परवाने रद्द करण्यात आले आहे त्यांना पुन्हा विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करण्यासाठी जाणीव जागृती मोहीम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.