बीजिंग – भारताबरोबरच्या वाढत्या तणावामुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्याला कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी या लढाऊ परिस्थितीत सशस्त्र सैन्य दलाला अत्याधुनिक क्षेपणास्त्रासह सज्ज होण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या वर्षी जूनमध्ये गॅलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित चकमक झाली होती. त्यावेळी जिथे २० भारतीय सैनिक शहीद झाले, तेथे ४० हून अधिक चिनी सैनिक मारले गेले. त्यानंतर आता नवीन वर्षाच्या सुरूवातीला केंद्रीय सैन्य आयोगाच्या (सीएमसी) पहिल्या बैठकीत अध्यक्षपदावरून जिनपींग यांनी संबोधन केले. ते म्हणाले की, पिपल्स लिबरेशन आर्मीने कोणत्याही वेळी युद्धासाठी सज्ज असले पाहिजे, तसेच प्रत्यक्ष लढाईच्या परिस्थितीत प्रशिक्षण देऊन आपली सैन्य स्थिती आणखी मजबूत करा, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला युद्ध जिंकता येईल.
जिनपिंग यांनी सांगितले की, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे लष्करी युनिट पीएलए १ जुलै पर्यंत या कामात उत्कृष्ट कामगिरी करेल. तसेच सराव दरम्यान सराव दरम्यान तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्याची देखील त्यांनी शिफारस केली. यामध्ये कॉम्प्यूटर सिम्युलेशन आणि कवायतींमध्ये ऑनलाइन लढणे समाविष्ट आहेत. २०१२ च्या अखेरीस सीएमसीचे अध्यक्ष आणि प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, शी यांनी सैन्याला नेहमी युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. सन २०१५ मध्ये त्यांनी चिनी सैन्याचे आधुनिकीकरण करण्यास सुरुवात केली.
तर दुसरीकडे भारतीय सैन्य सीमेवर संपूर्ण लक्ष ठेवून आहे आणि चीनच्या कोणत्याही कृतीला उत्तर देण्यास तयार आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात रडार, क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रे तैनात केली. याच भागात भारतीय सैन्य देखील पूर्णपणे तयार आहे. आपल्या सैन्याने मोठ्या संख्येने टी – 9O आणि टी-72 टँक, तोफ, इतर सैन्य वाहने विविध संवेदनशील भागात नेली आहेत. विशेष म्हणजे, पूर्व लडाखमधील सीमेवर गेल्या नऊ महिन्यांपासून दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये तणाव आहे. तसेच दोन्ही देशांमधील सीमा विवाद सोडविण्यासाठी लष्करी व मुत्सद्दी चर्चादेखील सुरू आहेत.