युद्धातील लष्करी सामुग्रीच्या साठ्याचे महत्त्व
केंद्र सरकारने लष्कराला तातडीच्या घनघोर युद्धात १५ दिवस पुरेल इतक्या लष्करी सामुग्रीचा साठा करण्यास सांगितले आहे, अशी बातमी आज प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचा अर्थ नक्की काय आहे…..
हल्लीच्या पारंपरिक युद्धात एका गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते ती म्हणजे कोणत्याही देशाची किती दिवस युद्ध करण्याची क्षमता आहे. ही क्षमता त्या देशाची अर्थव्यवस्था, त्या देशाच्या लष्कराकडे असलेला दारुगोळा आणि युद्धसाहित्याचा साठा आणि त्याच्या रसदमार्गाची सुरक्षितता यावर अवलंबून असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास आज पाकिस्तानची युद्ध करण्याची क्षमता कोणत्याही बाह्यमदतीशिवाय जेमतेम १५ दिवसांची आहे, असे मानले जाते. कारण पाकिस्तानची परकी गंगाजळी आटलेली आहे, अर्थस्थिती डामाडोल आहे, त्यामुळे पाककडे ‘एफ-१६’ सारखी अमेरिकन विमाने असली व ती भारताविरुद्ध वापरण्यास अमेरिकेने परवानगी दिली तरी पाकिस्तान इंधनाअभावी ती पुरेशा कार्यक्षमतेने वापरू शकणार नाही. त्यामुळे पाकची फार काळ युद्ध लढण्याची क्षमता असणार नाही.
भारताची चीनविरुद्ध किती दिवस युद्ध करण्याची क्षमता आहे, ही एक अंदाज करण्याची गोष्ट आहे.
चीनची अर्थव्यवस्था व लष्करीबळ भारतापेक्षा अधिक असल्यामुळे ती चीनपेक्षा कमी असणार हे उघड आहे… पण आता भारतीय सरकारने ही क्षमता तातडीच्या व घनघोर युद्धासाठी १० दिवसांवरून १५ दिवसांवर नेण्याचा आदेश दिला आहे. ही एवढी गुप्त गोष्ट भारताने जाहीर का केली, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. यात दोन गोष्टी आहेत… एकतर हा माहितीयुद्धाचा प्रकार आहे… चीनसारखा देश आपली सर्व शस्त्रसामुग्री जमा करून सीमेवर उभा असताना दोन्ही देशांतले घनघोर युद्ध फक्त १५ दिवस चालेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. चीननेही भारताच्या या क्षमतेबाबत काही अंदाज बांधलेलाच असणार… या अंदाजाला फाटे फोडण्यासाठीच भारताने ही १५ दिवसांची बातमी फोडली आहे, यात काही शंका नाही. चीनने आपल्या युद्ध लढण्याच्या क्षमतेच्या प्रमाणात भारताच्या युद्ध लढण्याच्या क्षमतेचा अंदाज लावला असणार हे उघड आहे.
चीनचा हा अंदाज काय असू शकेल याचा अंदाज भारतीय लष्करानेही लावला असणार. इथे एक सांगायला हवे की, हे अंदाज म्हणजे लष्करी कार्यालयात बसून केलेले अंदाज नसतात… त्यासाठी सर्व गुप्तचर यंत्रणा कामाला लावल्या जातात… हाती आलेल्या माहितीची सत्यता पडताळली जाते.. एकमेकांकडे असलेल्या सर्व प्रकारच्या युद्धसामुग्रीची विस्तृत माहिती एकमेकांकडे असतेच.. तरीही बऱ्याच गोष्टी गुप्त असतात व बरीच खोटी माहिती पसरवलेली असते. त्यामुळे सखोल चौकशी करून हे अंदाज केले जातात व ते बरेचसे तथ्यांजवळ जाणारे असतात. त्यामुळे भारताने प्रसारमाध्यमांत दिलेल्या १५ दिवसांच्या बातमीकडे ना चीन दुर्लक्ष करू शकतो ना त्यावर विश्वास ठेवू शकतो… पण या बातमीमुळे पाक आणि चीन या दोन्हीकडच्या युद्धनियोजकांना आपल्या नियोजनावर पुन्हा एकदा नजर फिरवावी लागणार हे निश्चित.
भारताच्या सीमेवर आपण लाखभर सैन्य आणि अफाट युद्धासामुग्री जमविली असूनही भारतात भीतीचे वातावरण पसरलेले नाही, भारताचे लष्कर प्रमुख परदेश दौरे करीत आहेत, परराष्ट्रमंत्री विविध परिसंवादात, परिषदांत भाग घेत आहेत… विरोधी पक्षांनी आता चीनसंबंधी प्रश्न विचारणे बंद केले आहे… उलट ते शेतकरी आंदोलनासारखे लोकशाही देशात होणारे आंदोलन चालवित आहेत… सरकारही सीमाप्रश्नावर आपली मनधरणी करण्याऐवजी आंदोलक शेतक ऱ्यांची मनधरणी करीत आहे… हे सर्व चीनला बुचकळ्यात टाकणारे आहे. आक्रमणाचे संकट सीमेवर उभे असताना भारतीयांच्या जीवनात काहीही फरक पडलेला नाही, देशात कोणताही घबराट नाही, मदत मिळविण्यासाठी फार मोठी धावाधाव नाही… यामुळे लडाख आक्रमणाचे चिनी शिल्पकार गोंधळून गेले आहेत.
गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याने दिलेला अनपेक्षित रट्टा, कैलासश्रेणीतील शिखरे काबिज करून चिनी आक्रमणातली काढून घेतलेली हवा… यामुळे आता पुढे भारतीय सैन्य व सरकार काय करू शकते याचा अचूक अंदाज आल्याशिवाय चिनी सैन्य काही हालचाल करील असे वाटत नाही आणि चिनी सैन्याला हा अंदाज बांधता येऊ नये, असेच भारताचे प्रयत्न असणार.
दोन्ही देशांत कोअर कमांडर पातळीवर होणाऱ्या नवव्या बैठकीबाबत आता दोन्ही देश काहीच बोलत नाहीत, म्हणजे भारताने चर्चेची तयारी दाखवली आहे व चीनला तारखा कळवण्यास सांगितले आहे, पण चीन आता आठवी बैठक होऊन दीड महिना होत आला तरी तारीख कळवित नाही. त्याचे कारण उघड आहे.. भारताने प्रत्येक बैठकीत एकच मागणी लावून धरली आहे, ती म्हणजे एप्रिलपूर्व स्थितीत चीनने आपले सैन्य न्यावे… पण चीनला तसे करणे नामुष्कीचे आहे…
भारताने कैलास श्रेणीची पर्वतशिखरे सोडून द्यावीत अशी मागणी चीनने केली, पण भारताने तिला वाटाण्याच्या अक्षता लावल्या, त्यामुळे चीनला आता स्वस्थपणे लडाखच्या थंडीत सर्वसाधनसामुग्रीनिशी बसून वेळ काढावा लागेल.
लडाखमध्ये सध्या जी स्थिती आहे, ती भारताने मान्य करावी व तीच नवी नियंत्रण रेषा मानावी असा प्रस्ताव चीनने दिल्याची माहितीही नुकतीच प्रसिद्ध झाली होती.
चीनने तसे सुचवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या तरी भारत तसे मानण्यास तयार नाही, त्यामुळे भारताचे सर्व सैन्य लडाखमध्ये कायमचे राहणार असे दिसते. ही परिस्थिती असेल तर चीनलाही आपले सैन्य आता तिथेच कायम ठेवावे लागेल. त्याला आता मागे फिरता येणार नाही. याचा दीर्घकालीन परिणाम तिबेटमध्ये अस्थिरता निर्माण होण्यावर होऊ शकतो.