नवी दिल्ली – पूर्व लडाख येथील नियंत्रण रेषेवरील सीमा वादावरून भारत आणि चीनमधील संघर्ष कायम आहे. जगाच्या नजरेत चांगले भासवण्यासाठी चीन भारताशी शांततेत आणि चर्चेद्वारे मार्ग काढत असल्याचे दाखविले जाते. मात्र, चीन युद्धाची तयार करत असल्याचे समोर आले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्यास युद्धाची तयारी करण्यास सांगितले आहे. याबाबत सिन्हुआन वृत्तसंस्थेने माहिती प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर जिनपिंग यांनी चिनी सैन्याला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी दक्षिणेकडील प्रांत गुआंग्डोंग येथील लष्करी तळाला भेट दिली. त्यावेळी सैन्याला युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती वृत्तसंस्था सिन्हुआने दिली आहे. सिन्हुआच्या हवालानुसार, जिनपिंग यांनी चाओझोउ शहरातील पिपल्स लिबरेशन आर्मीच्या तपासणी दरम्यान सैनिकांना हाय अलर्टवर राहण्याचे सांगितले आहे.
चीन आणि अमेरिकेमधील तणाव हा कोरोना काळात चर्चेत आहे. त्याचबरोबर सीमेच्या वादावरुन भारताशी असलेले संबंध दिवसेंदिवस बिघडत आहे. चीन आणि भारत यांनी सीमेवर सैन्य तैनात केले आहे. चिनी शिष्टमंडळाने सैन्याच्या माघारीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सोमवारच्या चर्चेत प्रस्ताव ठेवला होता, अशीही माहिती मिळाली आहे.