नाशिक – शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या यशवंत मंडईतील नॅशनल युको बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी बँकेची स्टेशनरी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात मोठी रक्कम चोरीला गेलेली नाही मात्र कॉम्प्युटर आणि स्टेशनरी चोरीला गेली आहे.
नाशिकच्या रविवार कारंजा भागात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या युको बँकेत दोन दिवसापूर्वी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी घरफोडी केल्याची घटना आज (१० ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. रविवार कारंजा ही व्यापार पेठ असल्याने या ठिकाणी कायम वर्दळ असते. यशवंत मंडई मध्ये असलेल्या नॅशनल युको बँकेच्या मागील बाजूला असलेल्या भिंतीला भगदाड पाडून सिनेस्टाईल दरोडा टाकण्यात आला आहे. बँकेत घुसल्यानंतर चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त फेकले असून सीसीटीव्ही कंट्रोल रूमची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, समीर शेख, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण व्यापारी पेठेत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करावा आणि रात्रीच्या वेळी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.