नवी दिल्ली – यंदाच्या होळी आणि धूळवडीला कोरोनाचं ग्रहण लागलं आहे. राजधानी दिल्लीसह देशाच्या इतर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं रंगाचा बेरंग झाला आहे. पावलापावलावर लोकांना कोरोना संसर्गाची भीती जाणवत आहे. गेल्या साडेपाच महिन्यांनंतर शनिवारी देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या दहा दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. १६ मार्चला २४,४९२ रुग्ण आढळले होते. शनिवारी ६२ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तीन महिन्यांनंतर २४ तासात २९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सकाळी आठ वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात ६२,२५८ कोरोनारुग्ण आढळले आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी १६ ऑक्टोबरला याहून अधिक ६३,३७१ रुग्ण आढळले होते. देशातील एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या एक कोटी १९ लाख आठ हजार इतकी झाली आहे.
सलग १७ व्या दिवशी नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात आता उपाचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढून ४,५२,६४७ झाली आहे. एकूण रुग्णांच्या ३.८० टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर घटून ९४.८५ टक्के आणि मृत्यू दर घटून १.३५ टक्के राहिला आहे. संसर्गामुळे आणखी २९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रात ११२, पंजाबमध्ये ५९, छत्तीसगडमध्ये २२, केरळमध्ये १४ आणि कर्नाटकमध्ये १३ जणांचा समावेश आहे. देशातील एकूण मृतांचा आकडा १,६१,२४० झाला आहे. आतापर्यंत एक कोटी १२ लाख ९५ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नमुने तपासणी
भारतीय चिकित्सा संशोधन परिषद (आयसीएमआर) नुसार, २६ मार्चपर्यंत देशात २३ कोटी ९७ लाख ६९ हजार ५५३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये शुक्रवारी तपासणी करण्यात आलेले ११,६४,९१५ नमुन्यांचा समावेश आहे.
वेगानं पसरतोय कोरोना
आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, की सहा राज्य ज्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनारुग्णांच्या रोजच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात संसर्ग झालेल्या ७९.५७ टक्के रुग्ण याच राज्यातील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ३६,९०२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर पंजाबमध्ये ३,१२२ आणि छत्तीसगडमध्ये २,६६५ नवे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व मिळून १० राज्यात नवे रुग्ण वाढत आहेत.