नवी दिल्ली – सार्वजनिक सुट्या, मार्च अखेरच्या कामांमुळे बँकांच्या ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागणारच आहे. पण आणखी एका समस्येमुळे बँका आणि ग्राहकांमधील व्यवहार बाधित होऊ शकतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने ४० डिफॉल्ट कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या बँका घाऊक व्यावसायिक संदेश पाठवण्याबाबतचे नियम पूर्ण करत नसल्याचं आढळलं आहे. प्रमुख बँकांना ट्रायनं नियम पाळण्याबाबत अनेकदा सांगितलं आहे. यामध्ये एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय बँकांचा समावेश आहे.
या कंपन्यांना ३१ मार्च २०२१ पर्यंत नियमांचं पालन करण्याची मुदत आहे. नियम न पाळले गेल्यास एप्रिलमध्ये ग्राहक आणि बँकांच्या व्यवहारामध्ये बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. ट्रायनं स्पष्ट केलं की, प्रमुख कंपन्या, टेलिमार्केटिंग कंपन्यांना नियामकानं घालून दिलेल्या नियमांची पूर्तता करणं अनिवार्य असून, त्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला आहे. ग्राहकांना नियमाकाच्या लाभापासून वंचित ठेवलं जाऊ शकत नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यात कंपन्यांचे संदेश या नियमांची पूर्तता करणार नाही, त्याला रोखण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
बनावट, खोट्या एसएमएसपासून ग्राहकांची सुटका करण्यासाठी व्यावसायिक मेसेजवर लगाम लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशा एसएमएसना ट्रायकडे एका फॉर्मेटमध्ये नोंद करून ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरून ग्राहकांना खरा मेसेज पोहोचेल, ते गंडले जाणार नाहीत. ट्रायच्या आदेशांना कंपन्यांनी गंभीरतेनं न घेतल्यानं त्यांच्या निष्काळजीपणाचा त्रास ग्राहकांना सोसावा लागणार आहे. पुढील महिन्यापासून डिफॉल्टर कंपन्यांच्या मेसेज, ओटीपींना नव्या व्यवस्थेद्वारे ट्राय रेजेक्ट करणार आहे.