काठमांडू – नेपाळच्या सांस्कृतिक, पर्यटन आणि नागरी उड्डयन मंत्रालयाने दोन भारतीय गिर्यारोहक आणि त्यांच्या पथकांच्या नेत्यांवर सहा वर्षांची बंदी घातली आहे. या दोन्ही गिर्यारोहकांपैकी एकावर पर्वत चढण्यावर बंदी घातली आहे. या दोघांनी २०१६ मध्ये दावा केला होता की, त्यांनी एव्हरेस्टच्या शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली होती, परंतु तपासणीत हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
नेपाळच्या पर्यटन विभागाने नरेंद्र सिंह यादव आणि सीमा राणी गोस्वामी यांच्या या मोहिमेला प्रमाणपत्रही दिले. त्यानंतर नरेंद्र यादव यांना एका पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते, परंतु कोणताही पुरावा सादर करण्यात ते अपयशी ठरले. याबाबत गिर्यारोहकांनी प्रश्न उपस्थित केले होते.
८८४८.८६ मीटर (२९ हजार ३२ फूट) उंच अशा एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न आहे. नरेंद्र यादव यांना प्रतिष्ठीत अॅडव्हेंचर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. तेव्हा इतर गिर्यारोहकांनी ते एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले का, असा प्रश्न उपस्थित केला.
यावर नेपाळ पर्यटन मंत्रालयाचे म्हटले आहे की, इतर गिर्यारोहकांशी बोलणी व सविस्तर तपासणी केल्यावर असे आढळले की, हे दोघे कधीही एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले नाहीत. तसेच ते कोणत्याही प्रकारचे छायाचित्र किंवा इतर पुरावे दर्शविण्यात अपयशी ठरले. त्यांनी तपासात आम्हाला बनावट कागदपत्रे आणि छायाचित्रे सादर केल्याचे आढळले आहे.
यांच्यावर झाली कारवाई
नरेंद्र यादव, सीमा गोस्वामी आणि टीम लीडर नबा कुमार फ्यूकोण यांच्यावर ६ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच नेपाळ सरकारने भारतीय नागरिकांसाठी मोहीम राबविणार्या एजन्सी सेव्हन समिट ट्रॅक्स प्रायव्हेट लिमिटेडला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सांस्कृतिक मंत्रालयाने या पथकाचे परवाना अधिकारी पवनकुमार घिमिरे यांनाही इशारा दिला आहे की, भविष्यात चुकांची पुनरावृत्ती करू नका. या मोहिमे दरम्यान नरेंद्र सिंह यादव यांनी एव्हरेस्टवर यशस्वीरित्या चढलो असल्याचा दावा करून एका शेर्पाने देखील खोटी कागदपत्रे दाखल केली होती.