नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पेठ केंद्रातील जांभूळमाळ येथील शिक्षक दाम्पत्यानेच विद्यार्थ्यांसाठी मास्क तयार केले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना विशेष फायदा होत आहे.
शाळेचे शिक्षक सुभाष निंबारे व बेहेडमाळ शाळेच्या शिक्षिका सुशिला भांगरे ( निंबारे) या दाम्पत्याने कोरोना काळात २ महिने स्वतः मास्क तयार करून १८ शाळांच्या २ हजार त्याचे मोफत वाटप केले. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्नशील असताना सामाजिक दायित्वाची जाणीव ठेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करून निंबारे दाम्पत्याने कोरोना योध्याची भूमिका निभावली आहे.
निंबारे दाम्पत्याने लॉकडाउनच्या काळात कापडापासून मास्क तयार केले. विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, केंद्र प्रमुख पुष्पा गीत, सोशल नेटवर्कीग फोरमचे तालुका समन्वयक रामदास शिंदे यांच्या उपस्थितीत मास्कचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शखाली शासनाच्या नियमांचे करत प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क देण्यात आले. गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी निंबारे परिवाराचे कौतूक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी कागदावर थँक यु लिहून अनोख्या पद्धतीने सुभाष निंबारे आणि सुशिला भांगरे (निंबारे) यांचे आभार मानले.