नवी दिल्ली – जागतिक वन्यजीव फंड या संस्थेने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) जगातील पाण्याच्या भीषण संकटाकडे लक्ष वेधून भारतासाठी भविष्यकाळातील पाणी टंचाईचे एक भयानक चित्र मांडले आहे.
डब्ल्यूडब्ल्यूएफच्या एका अहवालातील विश्लेषणामध्ये असे म्हटले आहे की, राष्ट्रीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेला महत्त्व असणारी आणि 350 दशलक्ष लोकांची घरे असलेल्या 1OO शहरांमध्ये इ.स. 2O50 पर्यंत पाण्याच्या बाबत सर्वाधिक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत हवामानातील बदल आणि प्रतिकुल परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्वरित कारवाई केली जात नाही. तोपर्यंत चित्र बदलणार नाही. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या अहवालात 1OOपैकी सुमारे 28 भारतीय शहरांची नावे देण्यात आली असून त्यानुसार येत्या काही दशकांत पाण्याचे वाढते धोके भोगावे लागतील.
या शहरांना धोका
यात जयपूर (45 व्या) आणि इंदूर (75 व्या) स्थानावर असून आणखी अशी काही शहरे या यादीमध्ये समाविष्ट आहेत. यात अमृतसर, पुणे, श्रीनगर, कोलकाता, बेंगलुरू, मुंबई, कोझिकोड, विशाखापट्टणम, ठाणे, वडोदरा, राजकोट, कोटा, नाशिक, अहमदाबाद, जबलपूर, हुबळी-धारवाड, नागपूर, चंदीगड, लुधियाना, जालंधर, धनबाद, भोपाळ, ग्वालियर, सुरत, दिल्ली, अलिगड, लखनऊ आणि कन्नूर या शहरांचा समावेश आहे.
असे आहेत स्टार
या विश्लेषणानुसार या शहरांना इ.स.2030 आणि 2O50 मध्ये पाचपैकी धोक्याचे चार ते दोन स्टार देण्यात आले होते, जिथे तीनपेक्षा जास्त स्टार आहेत, तेथे थोडी गंभीर स्थिती असते आणि चारच्यावरील स्टार म्हणजे ‘खूप जास्त धोका’ असे दिसते. भारताच्या भविष्यातील या संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे.
निम्मी शहरे चीनमध्ये
अनेक शहरांमध्येच नेहमी पूर आणि पाण्याची टंचाई या सारख्या समस्यावर मात करण्यासाठी शहरी पाणलोट व ओसाडू जमीनीवर वृक्षसंवर्धन करणे यासारख्या निसर्गावर आधारित उपाय योग्य ठरू शकतात. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या इंडिया विभागाचे प्रोग्राम डायरेक्टर डॉ. सेजल वोरा यांनी एका निवेदनात सांगितले की, जगातील या समस्या मध्ये समाविष्ट जवळपास १०० शहरांपैकी निम्मी शहरे चीनमध्ये आहेत, तर आणखी काही शहरे दक्षिण आशिया, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका येथे आहेत. तथापि, पाण्याचे सर्वाधिक संकट असणार्या शहरांच्या सध्याच्या आणि भविष्यातील या दोन्हीही याद्यांमध्ये भारतातील शहरे असणे ही गंभीर बाब समोर आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.