नवी दिल्ली – दिल्लीतील सरकारी व सरकारमान्य शाळांमध्ये शिकणाऱ्या तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यांना ‘नो डिटेंशन पॉलिसी‘ अंतर्गत पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. वार्षिक परीक्षेऐवजी असाईनमेट व वर्कशीटच्या आधारावर त्यांचे मुल्यांकन केले जाणार आहे. कोरोनामुळे शाळा बंद झाल्यानंतर गेल्यावर्षी सुद्धा याच धोरणांतर्गत पुढच्या वर्गात पाठविण्यात आले होते. शिक्षण संचालनालयाने यासंदर्भातील आदेश यावर्षीसुद्धा जारी केले आहेत.
कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. एप्रिलपासून शाळेत नवीन सत्र सुरू होत असते. अश्यात यावेळी पुन्हा एकदा असाईनमेंटच्या आधारावर मुलांना पुढच्या वर्गात प्रमोट करण्याची वेळ आली आहे.
मुलांचे मुल्यांकन शंभर गुणांच्या निकषांवरच होणार आहेत. त्यासाठी गुणांचे वेटेजही तयार करण्यात आले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पर्यायी शिक्षण पद्धतीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी हे मुल्यांकन केले जात आहे. यावरून पुढील सत्राचे धोरण निश्चित करायला संचालनालयाला सोपे जाणार आहे, असा विचार आहे.
शाळेत बोलावले जाणार नाही
सरकारी शाळेच्या मुलांचे गुण अपलोड करण्याचे काम १५ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. सहशैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा मुलांना ग्रेड देईल. मुल्यांकनानंतर ३१ मार्चला निकाल जाहीर करण्यात येईल.
मात्र त्यासाठी मुलांना शाळेत बोलावले जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. यात तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन वेगळ्या पद्धतीने होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.