रायपूर – आतापर्यंत आपण वेगवेगळ्या देवी देवतांची मंदिरे पाहिली आहेत. पण, आपल्या देशात असेही एक मंदिर आहे जिथे चक्क कुत्र्याची पूजा केली जाते. हे मंदीर कुकूरदेव मंदिर म्हणून ओळखले जाते.
छत्तीसगडमधील रायपूर येथून जवळपास १३२ किमी अंतरावर दुर्ग जिल्ह्यात खापरी गावात हे मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात कुत्र्याची मूर्ती आहे. बाजूलाच एक शिवलिंग देखील आहे. श्रावणात येथे भक्तांची खूप गर्दी असते. शिवलिंगासोबतच या कुत्र्याच्या मूर्तीची पूजा केली जाते. नंदीसारखाच मान येथे कुत्र्याला दिला जातो. मंदिराच्या प्रवेशद्वारावरही कुत्र्यांच्या दोन मूर्ती आहेत. विशेष म्हणजे कुकूरदेवाचे दर्शन घेतले की, कुत्रा चावत नाही असा येथील लोकांचा समज आहे.
या मंदिराची एक प्रचलित कहाणी आहे. हे मंदिर म्हणजे एका प्रामाणिक कुत्र्याचे स्मारक आहे. खूप वर्षांपूर्वी एक बंजारा परिवार येथे आला होता. त्यांच्यासोबत त्यांचा कुत्राही होता. एकदा दुष्काळ पडल्याने या बंजारा परिवारातील प्रमुख व्यक्तीने सावकाराकडून कर्ज घेतले. पण तो कर्ज फेडू न शकल्याने त्याने आपला कुत्रा सावकाराकडे गहाण ठेवला. काही दिवसांनी या सावकाराकडे चोरी झाली.
चोरी झालेला माल या कुत्र्याने सावकाराला शोधून दिला. कुत्र्याच्या या प्रामाणिकपणाने खुश होऊन सावकाराने त्याला मूळ मालकाकडे परत पाठवण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्याच्या गळ्यात एक चिट्ठी बांधून कुत्र्याला बंजारा कुटुंबाकडे परत पाठवण्यात आले. पण कुत्र्याला पाहताच हा बहुधा पळून आला असावा, असा बंजाऱ्यांचा समज झाला आणि त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यातच कुत्र्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर गळ्यात अडकवलेली चिट्ठी वाचून बंजारा कुटुंबप्रमुखाला पश्चात्ताप झाला. आणि तेथेच त्यांनी कुत्र्याचे स्मारक उभारले. त्यानंतर लोकांनी त्याला मंदिराचे रूप दिले.