मुंबई – अमेरिकेतील अंतराळ संशोधन करणारी नासा या संस्थेने गुरुवारी मंगळग्रहावर यान उतरविले. मार्स रोव्हर ला एखाद्या ग्रहावर उतरविणे ही अंतराळ विज्ञानातील सर्वांत अनोखी बाब समजली जाते. तसेच हे काम जोखीमपूर्ण समजले जाते. हे एेतिहासिक मिशन पूर्ण करणाऱ्या वैज्ञानिकांमध्ये मुळ भारतीय वंशाच्या डॉ. स्वाती मोहन यांनी अत्यंत मोलाची भूमिका निभावली आहे.
नासा आणि विशेषत्वाने त्याच्या नियंत्रणावर काम करणाऱ्या लोकांवर मोठे दडपण तयार होत असते, त्या विकास प्रणालीचा एक भाग डॉ. स्वाती मोहन देखील आहेत. नासाच्या इंजिनीयर डॉ. स्वाती मोहन यांनी सांगितले की मंगळ ग्रहावर टचडाऊनची खात्री पटलेली आहे. आता मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीच्या शोधाचे काम सुरू करण्यासाठी सज्ज आहे.
ज्यावेळी संपूर्ण जग या एेतिहासिक लँडिंगला बघत होते, त्यावेळी नासाच्या नियंत्रण कक्षात कपाळावर कुंकवाचा टिळा लावलेल्या स्वाती मोहन आपल्या टीमसोबत समन्वय साधण्यात व्यस्त होती.
कोण आहे स्वाती मोहन?
या प्रक्रियेदरम्यान स्वाती मोहन मुख्य सिस्टीम इंजिनियर तर आहेतच शिवाय त्या टीमची काळजी देखील करतात. जीएन अँड सीसाठी मिशन कंट्रोल स्टाफिंगचे शेड्यूलही करतात. नासाच्या वैज्ञानिक स्वाती एक वर्षाची असताना भारतातून अमेरिकेत गेली. त्यांनी आपले बालपण बहुतांश उत्तर व्हर्जिविया-वॉशिंगटन डीसी मेट्रो क्षेत्रात घालवले. ९ वर्षांच्या असतांना त्यांनी पहिल्यांना स्टार ट्रेक बघितले होते. त्यानंतर त्या ब्रह्मांडाच्या नव्या क्षेत्राच्या सुरेख चित्रणांनी चकित झाल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी अंतराळातील नवनवे स्थान शोधण्याची संधी मिळेल, असेच काहीतरी आयुष्यात करण्याचा निर्धार केला होता. तर १६ व्या वर्षी बालरोगतज्ज्ञ होण्याचे त्यांचे स्वप्न होते. डॉ. स्वाती मोहन यांनी कॉर्नेल विद्यापीठातून मेकॅनिकल आणि एयरोस्पेस इंजिनियरिंगची पदवी घेतली आणि एरोनॉटिक्समध्ये एमआयटीतून एमएस आणि पीएचडी पूर्ण केले.