मुंबई – चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे झगमगते आयुष्य सगळ्यांनाच आकर्षित करत असते. अगदी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांना फार रस असतो. पण असं आयुष्य जगणाऱ्या या कलाकारांच्या आयुष्यातही एखादी दुखरी बाजू असते. अनेकदा या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य हे विस्कळीत झालेलं आढळत. पण हे दुःख मनात दाबून ठेवून हे कलाकार सार्वजनिक आयुष्यात वावरत असतात. यातील सर्वात मोठं दुःख म्हणजे पुत्रशोकाचं.
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचं वैयक्तिक आयुष्य हे कटू आठवणींनी भरलेलं. त्यांचे २ लग्न झाले आहेत. पहिल्या पतीपासून २ मुलगे आणि एक मुलगी आहे. सर्वात मोठ्या मुलाचं नाव हेमंत आणि मुलीचं नाव वर्षा. हेमंत यांचा २०१५ मध्ये कॅन्सरने मृत्यू झाला. तर वर्षा यांनी स्पोर्ट्स रायटर हेमंत केंकरे यांच्याशी विवाह केला होता. १९९८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्या आशाताईंसोबतच रहात होत्या. पण २०१२ मध्ये त्यांनी स्वतःला गोळी मारून घेत आत्महत्या केली.
सुप्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंह त्यांच्या तलम आवाजासाठी ओळखले जातात. आपल्या गाण्यातून दर्द मांडणाऱ्या जगजीत सिंहांना देखील या दुःखाला तोंड द्यावे लागले. १९९० मध्ये त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे विवेक सिंह याचे अपघाती निधन झाले. त्याचा त्यांना फार मोठा धक्का बसला. तर त्यांच्या पत्नी चित्रा सिंह यांच्यासाठी तर तो एवढा मोठा धक्का होता की, त्यांनी गाणे म्हणणेच सोडून दिले.
अभिनेता शेखर सुमन यांच्यावर तर पैशांअभावी आपल्या मुलाला गमावण्याची वेळ आली. करियर सुरु असतानाच एक काळ असा होता ती त्यांच्याकडे काही काम नव्हते. त्यातच आपल्या मुलाला हृदयाशी संबंधित काही आजार असल्याचे त्यांना कळले. त्याच्यावर उपचारासाठी खूप पैशांची गरज होती. पण तेवढी रक्कम जमा करू न शकल्याने अवघ्या ११ वर्षांच्या मुलाला ते गमावून बसले.
अभिनेता कबीर बेदी यांच्या मुलाने वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आत्महत्या केली. तो डिप्रेशन मध्ये होता. हा आजार इतका वाढला की त्याला स्क्रिझोफेनिया झाला. त्याच्यावर उपचार सुरु होते. पण त्या औषधांनी तो अधिकच उदास झाला. आणि त्यातच त्याने टोकाचे पाऊल उचलले.