नवी दिल्ली – तरुणाईला वेगाचे विलक्षण वेड असते. यामुळेच ते चारचाकीपेक्षा बाईकला प्राधान्य देतात. आपल्याला आवडणारी बाईक घेण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. अगदी परदेशातून बाईक इम्पोर्ट करण्याचीही त्यांची तयारी असते. अशाच एका भारी बाईकची सध्या इंटरनेटवरही क्रेझ आहे. ही बाईक किमतीनेही भारी आहे बरं का, कारण याची किंमत आहे तब्बल ७५ लाख.
होंडा गोल्डविंग ट्राईक ही बाईक बाजारात घेऊन जाऊन एक व्यक्ती भाज्या, फळ घेतानाचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर फिरतो आहे. ही बाईक भारतीय रस्त्यांवर दिसेल अशी कधी कोणी कल्पनाही केली नसेल.
पण या व्हिडिओतील ही व्यक्ती घराबाहेर बाईक पार्क करून घरातील कामे करताना दिसतो आहे. ही फारच आश्चर्याची गोष्ट आहे. एका पादचाऱ्याने हा व्हिडीओ काढून अपलोड केला होता.
होंडा गोल्डविंग ट्राईक ही बाईक गेल्या वर्षी दुबईतून आयात करण्यात आली होती. बाबू जॉन या एनआरआय व्यक्तीने ती आयात केली होती. ही बाईक आल्यानंतर ती कस्टम विभागाने जप्त केली होती. कारण, ही बाईक ताब्यात घेण्यासाठी तब्बल २४ लाख भरावे लागणार होते
. विशेष म्हणजे, ही रक्कम आयात शुल्काशिवायची होती. ही बाईक घरी आणण्यासाठी जॉन यांना खूप त्रास झाला. जवळपास १४ महिन्यांपूर्वी त्यांनी ही बाईक आयात केली होती. पण, सीमा शुल्क भरल्यानंतर वर्षभरापूर्वी त्यांना ती बाईक ताब्यात मिळाली. या मोटारसायकलीचे प्रकरण कोर्टापर्यंत गेले होते.