ढाका – बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतरच्या ५० व्या वर्षात जेव्हा तशनुवा यांनी प्रथमच टीव्हीवर बातम्या वाचल्या तेव्हा हा क्षण त्यांच्या स्वतःसाठीच नव्हे तर त्या देशासाठीदेखील संस्मरणीय ठरला. कारण तशनुवा आनन शिशिर या बांगलादेशच्या पहिल्या ट्रान्सजेंडर न्यूज अँकरचे नाव असून, त्यांची जीवन कहाणी अतिशय हृदयद्रावक आहे.
ट्रान्सजेंडर असूनही त्यांनी खास बातमी वाचन केले. ही बातमी संपताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कारण बातमी वाचन करताना त्या आतून पूर्णपणे हादरल्या होत्या. पण, एकदा बुलेटिन संपल्यावर त्यांना खूप छान वाटले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्या क्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, त्या आता खूप आनंदित आहेत.

मात्र मागील दिवसांची आठवण करून त्यांनी म्हटले आहे की, ती किशोरवयीन असताना लैंगिक हिंसाचाराचा बळी ठरली होती. त्यांना शांत राहण्याची धमकी दिली गेली. तो काळ अत्यंत कठीण आणि वाईट होता, काही वेळा त्यांच्या मनात आत्महत्येचे विचारही होते. त्यांच्या वडिलांनी तिच्याशी बोलणे थांबवल्याने ती घराबाहेर पडली आणि ढाका येथे आली जिथे ती पूर्णपणे एकटी होती. त्यानंतर अभ्यास करून जानेवारीमध्ये, सार्वजनिक आरोग्यामध्ये पदव्युत्तर पदवी मिळविणारी ती पहिली ट्रान्सजेंडर ठरली.
तशनुवा यांनी सांगितले की, बोसाखी टीव्हीने त्यांना सुमारे अडीच महिन्यांपूर्वी ऑडिशनसाठी आमंत्रित केले होते आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. स्वच्छ उच्चारांमुळेच त्यांना या कामासाठी निवडले गेले. तथापि, त्या आधी बर्याच जणांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि काहींनी त्याला ऑडिशनसाठी बोलावले पण अपमान केला.










