नवी दिल्ली – केंद्रीय संस्कृती मंत्री प्रह्लादसिंग पटेल यांनी १३ व्या शतकातील प्रभू राम, लक्ष्मण आणि देवी सीता यांच्या कांस्य मूर्ती तामिळनाडू मूर्ती शाखेकडे सुपूर्द केल्या. यावेळी सांस्कृतिक मंत्रालय ,भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि तमिळनाडू सरकारचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
लंडनमधील मेट्रोपॉलिटन पोलिसांनी 15 सप्टेंबर 2020 रोजी या कांस्य मूर्ती लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तांकडे सुपूर्द केल्या होत्या. 1958 मधील छायाचित्र दस्तऐवजा नुसार, या मूर्ती तामिळनाडूच्या नागापट्टिनम जिल्ह्यातील आनंदमंगलममधील श्री राजगोपाल विष्णू मंदिराच्या मालकीच्या असून हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेलेआहे. तामिळनाडू पोलिसांच्या मूर्ती शाखेने केलेल्या तपासा नुसार श्री राजगोपाल विष्णू मंदिरातून या मूर्तींची चोरी 23/24 नोव्हेंबर 1978 रोजी करण्यात आली होती.
प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या या कांस्य मूर्ती भारतीय धातू कलेचा उत्कृष्ट नमुना असून या मूर्ती अनुक्रमे 90.5 सेमी, 78 सेमी आणि 74.5 सेमी उंचीच्या आहेत. या मूर्तींच्या शैलीनुसार या इसवी सन पूर्व 13 व्या शतकातील आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली 2014 पासून एकूण 40 पुरातन वस्तू परदेशातून भारतात परत आल्या असून 1976 पासून 2014 पर्यंत केवळ अशा 13 पुरातन वस्तू पुनर्प्राप्त झाल्या आहेत असे पटेल यांनी हस्तांतरण सोहळ्यादरम्यान माध्यमांना सांगितले.
या मूर्ती देशात परत आणण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, विशेष मूर्ती शाखा, तामिळनाडू सरकार, डीआरआय आणि भारत उच्चायुक्त लंडन यांनी केलेल्या अविरत प्रयत्नांसाठी त्यांचे पटेल यांनी अभिनंदन केले.