नवी दिल्ली – चीन आणि अमेरिकेने 6G सेवा सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, भारतात अद्यापही 4G सेवाच सुरू आहे. संसदीय समितीच्या अहवालानुसार, भारतात २०२२ पर्यंत 5G सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चीन 6G जी सुरू करण्याबाबत प्रयत्न करत आहे. हुवावे या चिनी कंपनीचे कॅनडामध्ये 6G रिसर्च सेंटर आहे, जिथे 6G तंत्रज्ञानावर मोठ्या गतीने काम सुरू आहे. चीनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 6G ट्रान्समिशनसाठी एअरवेव्हची चाचणी घेण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित केला होता, तर आणखी एक चिनी दूरसंचार कंपनी (झेडटीई ) देखील युनिकोम हाँग-कॉँगबरोबर या दिशेने काम करीत आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये 6G सुरू करण्याबाबत स्पर्धा सुरू असून गॅझेट्स 360 च्या अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाच्या काळात अमेरिकेने 6G तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरवात केली. अमेरिकेत 6G लाँच करण्यासाठी एटीआयएस म्हणजे अलायन्स फॉर टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री सोल्यूशन्सची स्थापना केली आहे, ती कंपनी गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून 6G या तंत्रज्ञानावर काम करत आहे. या मध्ये अॅपल, एटी अॅन्ड टी, क्वालकॉम, गुगल आणि सॅमसंग सारख्या कंपनीच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, युरोपियन युनियनने नोकियाच्या नेतृत्वात 6G वायरलेस प्रकल्प देखील सुरू केला, ज्यात एरिक्सन एबी आणि टेलिफोनिका एसए तसेच काही विद्यापीठांचा देखील समावेश आहे.