मुंबई – सामान्यतः कोणत्याही देशातील पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांच्या निवासस्थानांची सुरक्षा करण्याची जबाबदारी विशेष प्रशिक्षित कमांडोज किंवा सशस्त्र सेनेची असते. असे म्हणतात की राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधानांच्या निवासस्थानाची सुरक्षा इतकी कडक असते की तेथे परवानगीशिवाय पक्षी सुद्धा उडत येऊ शकत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अश्या देशाबद्दल सांगणार आहोत जेथे राष्ट्रपती भावनाची सुरक्षाच मुळात पक्षी करतात.
याचे एक खास कारण सुद्धा आहे. रशियाचे राष्ट्रपती भवन असलेल्या क्रेम्लीन आणि त्याच्या भवतालच्या इमारतींच्या सुरक्षेकरिता तेथील शासनाने पक्षांची नियुक्ती केलेली आहे. सुरक्षा रक्षक पक्षांमध्ये घुबड आणि घार यांचा समावेश आहे. शिकारी पक्ष्यांचे हे दल १९८४ पासून राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेचे कार्य करीत आहेत. त्यासाठी त्यांना विशेष पद्धतीने प्रशिक्षित केले गेले आहे. सुरक्षा दलात सध्या १० हून अधिक घुबड आणि घारी असल्याचे सांगितले जाते. सन १९८४ साली या अनोख्या सुरक्षा दलाची निर्मिती केली गेली होती. मात्र याचा उद्देश राष्ट्रपती भवनाला शत्रूच्या कुटील चालीपासून वाचवणे हा नसून कावळे आणि तत्सम अन्य पक्षांनी केलेल्या घाणीपासून राष्ट्रपती भवन आणि आजूबाजूच्या ऐतिहासिक सरकारी इमारतींची सुरक्षा करणे हा आहे. यासाठी घुबड आणि घारींना या भागात तैनात केले जाते.
कावळे आणि इतर पक्षांना बघताच हे सुरक्षा रक्षक त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना दूर पळवून लावतात. हे पक्षी राष्ट्रीय सेवा सुरक्षा सेवेचासुद्धा भाग आहेत. या सुरक्षा दलाचे नेतृत्त्व २० वर्षीय मादी घार ‘अल्फा’ आणि घुबड ‘फाईल्या’ यांच्याकडे आहे. कावळे दिसताच किंवा त्यांचा आवाज ऐकू येताच हे दोघे त्यांच्यावर तुटून पडतात आणि त्याना पळवून लावतात किंवा मारून टाकतात.
पक्षांच्या या सुरक्षा दलाचा सांभाळ करणाऱ्या चमूचे सदस्य असलेले २८ वर्षीय एलेक्स वालासोव सांगतात की प्रस्तुत पक्षांचा उद्देश केवळ कावळे पळवून लावणे इतका नसून त्यांना या सरकारी इमारतींवर घरटी बांधू न देणे हा देखील आहे. राष्ट्रपति भवन क्रेमलिन आणि त्याच्या अवती भवती च्या इमारतींची देखरेख करणारे पावेल माल्कोव सांगात की सोव्हिएत संघ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत या इमारतींची सुरक्षा करण्यासाठी आणि कावळ्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी गार्डस ची नियुक्ती करण्यात आली होती.
कावळ्यांना घाबरवता यावे यासाठी शिकारी पक्षांचे आवाज ध्वनिमुद्रित करून वाजवण्यात आले. मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. ‘फाईल्या’ घुबडास प्रशिक्षण देणारे डेनिस सिडोगिन यांनी सांगितले की रात्रीच्या वेळी शिकार करण्यात त्याचा हातखंडा आहे. अनेक कावळ्यांचा मुकाबला करण्यासाठी एकटा ‘फाईल्या’च पुरेसा आहे. आता या शिकारी पक्षांना विशेष प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात एखादे छोटे ड्रोन फिरताना आढळल्यास हे पक्षी त्याचा मुकाबला करू शकतील असे ते प्रशिक्षण आहे.