नवी दिल्ली – गुगल एक असे सर्च इंजिन आहे ज्यावर दिवसाला पाच बिलीयन पेक्षा अधिक प्रश्न विचारले जातात. अश्यात जर गुगल बंद झाले तर लोकांचे जगणे अवघड होऊन बसायचे. आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी गुगलचा आधार घेतो, त्यामुळे याची तीव्रता लक्षात येईल. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये गुगलची सेवा बंद होण्याची चिन्हे आहेत.
गुगलची सर्वांत महत्त्वाची आणि चांगली बाब ही आहे की, बहुतांश प्रश्नांची उत्तरे मिळतातही. एवढेच नव्हे तर त्या प्रश्नांशी संबंधित इतर माहितीही मिळते. मात्र आस्ट्रेलियातील युझर्ससाठी आता ही एक चिंतेची बाब ठरत आहे. कारण तेथील सरकार नव्या कायद्याच्या माध्यमातून गुगलची सेवा बंद करण्याची तयारी करीत आहे.
आस्ट्रेलियात आता असा एक नवा कायदा येतोय ज्या अंतर्गत आस्ट्रेलियन प्रकाशकांचा न्यूज कंटेंट प्रकाशित करण्यासाठी त्यांना पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर गुगलने आस्ट्रेलिया सरकारला हा कायदा मागे घेण्यास म्हटले आहे.
सोबतच असेही सांगितले आहे की, पब्लिशर्सला पैसा देण्याची जबरदस्ती केली तर आस्ट्रेलियातील आपले सर्च इंजिन बंद करू असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे युझर्सला अनेक संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण आस्ट्रेलियात ९५ टक्के इंटरनेट सर्च गुगलवरच केले जाते. आस्ट्रेलियात तयार होत असलेल्या या कायद्यावर केवळ गुगलच नाही तर फेसबुकनेही हरकत नोंदवली आहे.