जिनिव्हा – संयुक्त राष्ट्र संघाच्या कमिशन ऑफ इन्क्वायरीने आपल्या अहवालात एक धक्कादायक बाब उघड केली आहे की, सिरियामध्ये लाखो लोकांना मनमानी पध्दतीने अवैधरित्या ताब्यात घेण्यात आले असून त्यांना तुरूगांत टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या लोकांचे भविष्य अनिश्चिततेच्या सावटाखाली असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
आयोगाच्या या अहवालाचा असे म्हटले आहे की, सिरिया देश अनेक वर्षांपासून गृहयुद्धाच्या आगीत होरपळत आहे. येथे बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलेल्या शेकडो लोकांचा तुरुंगात मृत्यू देखील झाला आहे. तसेच त्यापैकी अनेकांना जिवे मारण्यात आले. या ठिकाणी अटकेत असलेल्या लोकांना अत्यंत अमानुष पद्धतीने तुरूंगात ठेवले गेले आहे. येथे जेलमध्ये केवळ पुरुषच नाही, तर महिलांचा देखील समावेश आहे. तसेच अनेक महिलांवर अत्याचार करण्यात आले आहे.
या अहवालाच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या शेकडो लोकांना ठार मारण्यात आले आहे. मानवतेविरूद्धच्या या भयानक गुन्हेगारीकृत्याचा जगभरातून जाहीर निषेध करण्यात येत आहे. तसेच आयोगाच्या या अहवालात केवळ सीरिया सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही तर सिरियामधील लोकांचे जीवन नरक बनवल्याबद्दल इस्लामिक स्टेटलाही दोषी ठरवले आहे.










