नवी दिल्ली – देश-परदेशात कोरोना विषाणूची दुसरी लाट गंभीररित्या वेगाने पसरत आहे. देशातील तीन महिन्यांची आकडेवारी पाहिल्यास चित्र स्पष्ट होण्याल मदत होईल. देशात १० जानेवारी २०२१ ला १८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. फेब्रुवारीत थोडा दिलासा मिळाला. कोरोनासंसर्ग थोडा कमी झाल्याचे जाणवत असतानाच मार्चमध्ये प्रादुर्भाव वेगाने वाढला. मार्च महिन्यातील आकडे पाहिल्यास १० मार्चला १७ हजार, २० मार्चला ४० हजार आणि १ एप्रिलला वाढून तो ७२ हजारांवर गेला.
कोणत्या देशात पुन्हा लॉकाडाउन
या वेळी कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. ब्रिटनमध्ये काही शहरांमध्ये लॉकाडाउन लावण्यात आला आहे. त्याशिवाय बेल्जिअममध्ये तिसर्यांदा लॉकडाउन लावण्याची गरज निर्माण झाली आहे. इटलीमध्ये तीनदा लॉकडाउन लावण्यात आलेले आहे. चिलीसुद्धा बंद आहे. भारतात ज्या वेगाने कोरानाचा प्रादुर्भाव होत आहे, त्यामुळे भारतासमोर कोणताही पर्याय नाही. एक एप्रिलला भारतात कोरोनाचे ७२ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. २४ तासात ४५९ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात भारतात कोरोनारुग्णांची संख्या चौपट वाढली आहे.
कॅनडामध्ये लॉकाडाउन
कॅनडाचे अधिक घनता असलेले राज्य ओंटिरियोमध्ये वेगाने फैलावणार्या कोरोना संसर्गामुळे तेथील स्थिती बिघडली आहे. महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी या ठिकाणी चार आठवड्यांचे पूर्ण लॉकडाउन लावण्यात आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहेत. जीम आणि पर्सनल केअरसुद्धा बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून, त्यातही मर्यादित लोक जाऊ शकतात. येथे दररोज अडीच हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत.
ब्राझीलमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर
ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर गेला आहे. येथे एका दिवसात ९१ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात ३,७६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. फक्त मार्चमध्येच ६६ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
फ्रान्स आणि तुर्कीमध्ये रुग्णसंख्या वाढली
फ्रान्समध्ये एका दिवसात ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. येथे एका दिवसात ३०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे येथे तिसर्या लॉकडाउनची तयारी सुरू झाली आहे. तुर्कीमध्ये एका दिवसात चाळीस हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. महामारी सुरू झाल्यानंतरची ही सर्वात जास्त रुग्णांची संख्या आहे.
पाकिस्तानात एका दिवसात ५ हजार रुग्ण
पाकिस्तानात गेल्या २४ तासात पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी जूननंतर एका दिवसात ही सर्वात मोठी वाढ आहे. कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत असताना तेथे लसीकरणाचा घोटाळा समोर आला आहे. जवळपास १४०० लोकांना अनधिकृत लोकांना लसीकरण करण्याची बाब उघड झाली आहे. या घोटाळ्यामध्ये तीन हॉस्पिटल सहभागी आहेत. सिंध प्रांतात सरकारने आगामी दहा दिवसांसाठी सर्व धार्मिक स्थळांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ब्रिटनने पाकिस्तान आणि बांगलादेशला रेड लिस्टमध्ये टाकले आहे. त्यामुळे या देशांमधून ब्रिटनमध्ये येता येणार नाही आणि जाताही येणार नाही.