मुंबई – दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रमुख अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नयनतारा हिचा उद्या जन्मदिवस. १८ नोव्हेंबरला ती आपला वाढदिवस साजरा करणार आहे. चित्रपटातील भूमिकांसोबतच तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील ती नेहमीच चर्चेत असते.
नयनताराचा जन्म मल्याळम ख्रिश्चन कुटुंबात झाला. वडील हवाई दलात असल्याने अनेक ठिकाणी तिचे शिक्षण झाले. कॉलेजमध्ये असताना ती मॉडेलिंग देखील करत असे. २००३ मध्ये मल्याळम चित्रपटातून तिला ब्रेक मिळाला. त्याचे दिग्दर्शक होते सतीयन अंथकड. त्यानंतर २००५ मध्ये तिने तामिळ आणि मग तेलगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. लागोपाठ मिळणाऱ्या चित्रपटांमुळे प्रमुख अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली. २०१० मध्ये कन्नड चित्रपटांत तिचा प्रवेश झाला. तर तिला बेस्ट तेलगू अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.
तिचे खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे. ख्रिश्चन कुटुंबात जन्म झाला असला तरी नयनतारा हिने हिंदू धर्म स्वीकारला. सीलांबरसन राजेंदर याच्यासोबत तिचे नाव जोडले गेले होते. पण आपला काही संबंध नाही असा खुलासा नयनतारा हिनेच २००६ मध्ये केला. त्यानंतर प्रभूदेवा याच्याशी पण तिचे नाव जोडले गेले. या दोघांनी २००९ मध्ये गुपचूप लग्न केल्याच्याही बातम्या होत्या. पण २०१२ मध्ये तिनेच ब्रेकअपची माहिती दिली.