नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनाला आता सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आणि राज्यसभेचे खासदार तथा शिरोमणी अकाली दल (डेमोक्रेटिक)चे प्रमुख सुखदेवसिंग धिंदसा यांनी पद्मभूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. तसेच, अर्जुन पुरस्कार विजेता कुस्तीपटू व पद्मश्री करतार सिंह यांनीही पुरस्कार वापसीची घोषणा केली आहे. तर, बास्केटबॉल खेळाडू सज्जनसिंग चिमा व हॉकीपटू राजबीर कौर यांनी त्यांचे अर्जुन पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले आहे.
गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ आणि शेतकऱ्यांच्या हिसासाठी पुरस्कार परत करीत असल्याचे दोघांनीही घोषित केले आहे. या पुरस्कार वापसीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अधिकाधिक पाठिंबा मिळत असून त्याचा दबाव केंद्र सरकारवर वाढत आहे.