बीड/औरंगाबाद – मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढत असून विविध जिल्ह्यांमध्ये खबरदारी घेतली जात आहे. बीड जिल्ह्यात देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सलग दहा दिवसांचा
लॉकडाऊन जाहीर केला आहे. २६ मार्चच्या रात्रीपासून ४ एप्रिलपर्यंत बीड शहरासह जिल्ह्यातील सर्व भागात कडक लॉकडाऊन असणार आहे.
सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लॉकडाऊनसंबंधी आदेश काढले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे. याआधी बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जगताप यांनी घेतला होता. १३ मार्चपासून रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील रोजंदारी आणि मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कारण मराठवाड्यात कारखानदारी नसल्याने अनेक लोक रोजंदारीवरच काम करतात किंवा ऊसतोड मजूर म्हणून कामावर जात आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीड परिचित आहे. त्यातच लॉकडाऊन झाले तर रोजगार कसा उपलब्ध करायचा असा सवाल मजूर आणि अन्य छोट्या व्यावसायिकांना पडला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको, अशी मागणी बीड सह मराठवाड्यातील नागरिक करता आहेत.
बीड शहरातील अनेक छोटे, मोठे व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने शहरातील व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कोरोनाची चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच होळी उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने यंदा होळी, धूळवड आणि रंगपंचमी हा उत्सव सार्वजनिक आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणार नाही असे दिसून येत आहे