जळगाव – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना काही जिल्ह्यात त्याचा प्रभाव अधिक जाणवत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर याप्रमाणे जळगाव जिल्ह्यात देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर उपाययोजना म्हणून २८ ते ३० मार्च पर्यंत जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यात २८ मार्च रोजी होळी आणि २९ मार्च रोजी धुलीवंदन साजरा करण्यात येणार असून सदर सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येण्याची शक्यता असल्याने कोवीड-१९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यात कोवीड-१९ बाधित व संशयित रुग्ण संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने सदर सणाच्या कालावधीत नागरिकांची होणारी वर्दळ व गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोवीड-१९ चा होणारा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात २८ मार्च रात्री १ वाजेपासून ३० मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत १४४ कलम अंतर्गत विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बाजारपेठा आठवडी बाजार त्याचप्रमाणे किराणा दुकाने व इतर व्यावसायिक दुकाने बंद राहतील, तसेच किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र बंद ठेवण्यात येतील. शैक्षणिक संस्था शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालय बंद राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंट सेवादेखील बंद ठेवली जातील. केवळ होम डिलीवरी पार्सल सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील.
तसेच सभा मेळावे बैठका धार्मिक स्थळे सांस्कृतिक व धार्मिक सण उत्सव कार्यक्रम बंद होतील. शॉपिंग मॉल्स, मार्केट त्याशिवाय गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृह ,नाट्यगृह, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, प्रेक्षागृह, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे ,संमेलने बंद राहतील.
प्रवासी वाहतूक सेवा वगळून खासगी वाहतूक बंद राहतील, दूध विक्री केंद्रे सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील. कोवीड१९ लसीकरण कार्यक्रम मात्र सुरू राहील, खासगी अस्थापना सुरू राहतील तथापि संबंधितांनी ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे.
होळी व धुलिवंदन सणानिमित्त कोणत्याही प्रकारे सामूहिक सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यास सक्त मनाई आहे. अत्यावश्यक सेवा म्हणजे अंबुलन्स आणि वैद्यकिय व्यवस्थापनासंबंधी घटक यांना मात्र यातून सुट असून वैद्यकीय उपचार सेवा, मेडिकल दुकाने यांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे ,अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या संबंधीच्या अवश्य कारवाईसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले असून तशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.